समृद्ध मातीशिवाय आध्यात्म शक्य नाही, असे सद्गुरूंनी म्हटले आहे. ईशा फाउंडेशन
Published on
:
25 Nov 2024, 8:54 am
Updated on
:
25 Nov 2024, 8:54 am
सद्गुरू, ईशा फाउंडेशन
लोक मला नेहमी विचारतात असतात, ‘सद्गुरू, तुम्ही इतक्या सगळ्या श्रीमंत आणि लोकप्रिय व्यक्तींना का भेटत असता? तुम्ही झोपडपट्टीतल्या लोकांना का नाही भेटत?”. मी त्यांना म्हणतो, ‘मी इतका निर्लज्ज मनुष्य नाहीये की मी ज्या लोकांना रोजची भाकरी मिळण्यासाठी झगडावं लागतंय, त्यांच्याशी जाऊन मुक्ती विषयी बोलीन.’ कुठल्याही आध्यात्मिक प्रक्रियेसाठी, सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे आपण जिवंत राहिलो पाहिजे. भौतिकाच्या पलीकडच्या गोष्टीचा विचारही करण्यासाठी, आपल्याला व्यवस्थित खायला मिळत असलं पाहिजे. जेव्हा कुणाचं पोट रिकामं असेल, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे पोटापाण्याची सोय करणं. जेव्हा पोटापाण्याची सोय होते, तेव्हा आपल्याला त्याचं विशेष वाटत नाही. पण जेव्हा त्याची सोय झालेली नसते, तेव्हा तेच सर्व काही असतं.
जर सर्व लोकांसाठी पोटापाण्याची सोय करणं सहज सुलभ नसेल, तर सर्व आध्यात्मिक प्रक्रिया लोप पावेल. आध्यात्माचा दर्जा या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाला याचं कारण २००- ३०० वर्षांचं दारिद्र्य. पण एकेकाळी, भारत एक संस्कृती म्हणून, हजारो वर्षांच्या आध्यात्मिक प्रक्रियेनं समृद्ध होता. याचं कारण आपल्याकडे आर्थिक स्थिरता आणि समृद्धी होती. म्हणून लोक स्वाभाविकपणे भौतिकाच्या पलीकडे, शरीर आणि मनाच्या पलीकडे शोध घेऊ लागले.
भौतिक पैलू आध्यात्माची पहिली पायरी आहे
तुमचं शरीर आणि तुमचं मन तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये एकतर वर चढण्याची पायरी बनू शकतं किंवा अडथळा बनू शकतं. जर तुम्ही एका जागी बसलात, आणि तुमचं शरीर इतक्या सहज अवस्थेत असलं की त्याच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीवह राहिली नाही, तर मग आध्यात्मिक प्रक्रिया तुमच्यासाठी एक शक्यता आहे. पण काही लोकांसाठी, उठता, बसता, किंवा आडवे झाल्यावर, कुठल्याच अवस्थेत ते सहज अरामात नसतात. अशा अवस्थेत आध्यात्माची कुठलीच शक्यता नाही.
जर तुम्हाला शरीर आणि मनाला अशा प्रकारे अनुकूल बनवायचे असेल जेणेकरून तुम्ही तुमच्या शाररीक गरजांच्या पलीकडे पाहू शकाल, तर आवश्यक पोषण आणि तुम्हाला पोषित करणारी सेंद्रिय उर्जा तुमच्याभोवती असली पाहिजे - कारण जे शरीर तुम्ही वाहता ते सर्वस्वी तुमचे नाही. तुमच्या शरीराचा केवळ चाळीस टक्के भाग हा तुमच्या पालकांकडून मिळणारी अनुवांशिक देणगी आहे: साठ टक्के भाग हा खरंतर सूक्ष्म जीवांने बनलेला आहे. हे सूक्ष्म जीव मातीच्या वरच्या १२ ते १५ इंचांमध्ये राहातात. जेव्हा ही परिस्थिती आहे, जर तुम्ही तुमच्या भोवतालचे हे सूक्ष्म जीवन सुस्थितीत ठेवले नाही, तर ते देखील खात्री करतील की तुम्ही व्यवस्थित जगू शकणार नाही. तुम्ही शाररीक दृष्ट्या निरोगी नसताना जर मी तुम्हाला ध्यान करा, योग साधना करा, तुमच्या परम प्रकृतीचा शोध घ्या असं सांगितलं, तर तुम्हला त्यामध्ये काहीच रस असणार नाही.
वेळ आलेली आहे आपल्याला हे समजण्याची की आपण जे कोण आहोत ते म्हणजे मातीमध्ये घडत असलेल्या जीवनाचेच एक प्रतिबिंब आहे.
माती वाचवा - एक आध्यामिक चळवळ
दर वर्षी, मातीमध्ये राहणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या साधारणपणे २७,००० प्रजाती नामशेष होत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या संघटना सांगत आहेत की धरतीवर केवळ पुढच्या ८० - १०० पिकांसाठी शेतजमीन शिल्लक आहे. याचा अर्थ पुढच्या ४५-६० वर्षांत आपल्याकडची माती संपून जाईल. जर तसे घडले, तर पृथ्वीवर भीषण अन्न टंचाई निर्माण होईल.
म्हणून, ‘कॉन्शियस प्लॅनेट - माती वाचवा’ चळवळ, ही आम्ही गेल्या चाळीस वर्ष करत असलेल्या आध्यात्मिक चळवळीपासून काही वेगळी नाही. मातीला पुनरुज्जीवित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. अद्याप न जन्मलेल्या पिढीचा विचार करण्याइतपत सर्व समावेशक भाव असणं हा अत्यंत आध्यात्मिक गुण आहे.
मला सर्व लोकांनी माती बद्दल जाणून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा आहे. ही एक खूप गंभीर समस्या आहे, पण आपल्याकडे पुढच्या १० - १५ वर्षांत ही प्रक्रिया उलटवण्याची संधी आहे. यासाठी प्रत्येक राष्ट्राने माती विषयक धोरण निर्माण केलं पाहिजे. ‘माती वाचवा’ चळवळ हेच करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सबंध जगभरातल्या ३.५ अब्ज नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून सर्व राजकीय पक्षांना आणि शासनांना माती पुनरुज्जीवित करण्यासाठीच्या दीर्घकालीन धोरणाची निर्मिती करण्यासाठी प्ररित करता येईल. चला आपण हे घडवून आणूया.
एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते ४ अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट - सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या लोकचळवळीचे संस्थापक देखील आहेत.