युवक काँग्रेसच्या आंदोलनात पोलिस आणि कार्यकर्त्यांची झटापट झाली. Pudhari photo
Published on
:
19 Jan 2025, 2:11 pm
Updated on
:
19 Jan 2025, 2:11 pm
नागपूर : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसने आज रविवारी सायंकाळी नागपुरात जोरदार आंदोलन केले. संघावर प्रतिबंध घाला अशा पद्धतीचे फलक,बॅनर हातात घेऊन कार्यकर्त्यांचा हा मोर्चा संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाला असता त्यांना पोलिसांनी चिटणीस पार्क परिसरातच रोखून धरले. बराच वेळ पोलिस आणि कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक, झटापट सुरू होती. अखेरीस पोलिसांनी बलप्रयोग करीत कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.
एकंदरीत या प्रकारामुळे शहर काँग्रेस कार्यालयासमोर तणावाचे वातावरण होते.नुकतेच इंदूर येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीनंतरच खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाले, अनुभवास आले अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विरोधात युवक काँग्रेस आज आक्रमक झाली.
शहर काँग्रेसच्या कार्यालयात देवडिया भवनात रविवारी सायंकाळी युवक काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत संघ, भाजप विरोधात मतप्रदर्शन झाल्यानंतर ही सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ता मंडळी मोर्चा स्वरूपात महाल बडकस चौक परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडे घोषणा देत जाण्यास निघाल्याने वातावरण तापले. मात्र पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कार्यकर्त्यांना वेळीच बरिकॅड लावून रोखून धरले. आम्हाला संघ मुख्यालयाकडे जाऊ द्या रोखू नका, उलट सुलट विधाने करणाऱ्या संघ भाजपचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी कार्यकर्ते करीत होते. अखेरीस पोलिसांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.