सामना अग्रलेख – बा महाराष्ट्रा!

2 days ago 2

आज महाराष्ट्राचे चित्र काय आहे? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी आणि डावे पक्ष असे सगळे महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढण्यासाठी व जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. समस्त मराठी बांधव, शेतकरी युवक, ख्रिस्ती, मुसलमान बांधव महाराष्ट्र धर्माच्या विजयासाठी सज्ज आहेत. महाराष्ट्राच्या हातात मशाल धगधगत आहे. मजबूत मनगटी हातात विजयाची तुतारी वाजते आहे. बा महाराष्ट्रा, विजय तुझाच आहे. 288 मतदारसंघांत आपला महाराष्ट्र निवडणूक लढत आहे. महाराष्ट्र विजयी होईल! मतदार राजा, स्वाभिमानाची मशाल पेटू दे, विजयाची तुतारी वाजू दे!

महाराष्ट्राच्या भविष्याचा निकाल ठरविणारी विधानसभा निवडणूक आज होत आहे. हा अग्रलेख हाती पडेपर्यंत मतदानास सुरुवात झालेली असेल. दोन दिवसांपूर्वी प्रचार संपला. म्हणजे तोफा थंडावल्या, तलवारी म्यान झाल्या असे म्हणायची पद्धत आहे, पण तलवारी म्यान झाल्या तरी पैशांच्या थैल्या आणि खोके उघडून मतदारांना विकत घेण्याच्या मोहिमा काही थांबलेल्या नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि निवडणुकांचे इतके व्यापारीकरण याआधी कधीच झाले नव्हते. आधी आमदार, खासदार विकत घेतले, आता मतदारसंघ विकत घेण्यासाठी खोक्यांचा पाऊस पाडला जात आहे. खुद्द भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावरच विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. त्यावरून भाजप आणि स्थानिक बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. ‘बविआ’च्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना हॉटेलमध्येच अडकवून ठेवले होते. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही मिंध्यांच्या उमेदवाराकडून पैसे वाटप केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बोटाला शाई लावून मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड ताब्यात घेऊन पैसे वाटप झाल्याचा प्रकारही तेथे घडल्याचा आरोप याआधी झालाच होता. नाशिकमध्येही भाजपवाल्यांवर याच पद्धतीचे आरोप झाले आहेत. सत्तापक्षांकडून मतदानासाठी पैशांचा बाजारच मांडल्याचे हे चित्र भयंकर आणि महाराष्ट्राच्या आजवरच्या स्वच्छ राजकीय इतिहासाला कलंक फासणारे आहे. अशा वेळी महाराष्ट्र आपले इमान आणि स्वाभिमान राखणार की नाही हाच प्रश्न आहे. पैसा आणि रक्तपाताच्या मार्गावरून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक चालली आहे. मुंबईत प्रचारादरम्यान एका माजी मंत्र्याची हत्या होते व मतदानाच्या आदल्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खुनी हल्ला घडवून त्यांना जिवे मारण्याचा डाव रचला जातो. महाराष्ट्रासारख्या राज्यात इतके खुनशी आणि दळभद्री प्रकार कधी घडले नव्हते. आज या आपल्या महाराष्ट्राचे चित्र काय आहे? एखाद्या कोऱ्या कागदावर कोणीतरी पानाची पिचकारी मारावी त्याप्रमाणे

महाराष्ट्राचा नकाशा विद्रूप

झाला आहे. महाराष्ट्राचे समाजमन दुभंगले आहे. जाती-जातीत भांडणे लावून, धर्मा-धर्मात द्वेष पसरवून दिल्लीचा सुलतान व त्याचे महाराष्ट्रातील लाचार सरदार मजा पाहत आहेत. गौतम अदानीसारखे माजलेले उंदीर मुंबईसह महाराष्ट्र कुरतडू लागले आहेत. अशा वेळी आम्हाला आठवलेली शाहीर अमरशेखांची संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील ती ललकारी,

‘बा महाराष्ट्रा
इभ्रत तुझी हीरशेला पडली
काडा नवका बाहेर
शिवरायांची मुंबई
वादळात शिरली!’

महाराष्ट्रद्रोह्यांचे वादळ महाराष्ट्रावर घोंघावत आहे. लचके तोडणारी गिधाडे फडफडत आहेत. महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती ही जणू आपल्या बापजाद्यांची मालमत्ता समजून गुजरात व्यापार मंडळांकडून लांडगेतोड चालली आहे. याच लांडग्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पैशांच्या बळावर तोडली. शिवसेना तोडली म्हणजे मुंबईचा घास गिळणे सोपे जाईल, पण शिवसेना तुमच्या जबड्यात हात घालून तुमची आतडी बाहेर काढेल. मुंबई व महाराष्ट्राचे लचके तोडणे तुमच्या बापांना शक्य नाही. मोदी-शहा-फडणवीस-मिंधे या चौकडीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी उभा दावा मांडला. ही चौकडी शिवरायांच्या महाराष्ट्राची दुश्मन आहे. गेल्या तीनेक वर्षांत शिवसेनेच्या वाटय़ाला जे जीवन आले ते इतके धकाधकीचे, संघर्षाचे आणि कसोटीचे होते की, त्या जागी इतर कोणतीही संघटना असती तर ती नामशेष झाली असती. शिवसेनेच्या मागे ना अदानीशेठ ना अंबानी! ना सत्ता ना पैशांचे बळ! पण तरीही विचाराच्या श्रीमंतीशी व शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेल्या मार्गाशी आम्ही कधीच तडजोड केली नाही. त्याची किंमतही आम्हाला वेळोवेळी मोजावी लागली, पण दरिद्री राजकारण आम्ही कधीच खेळलो नाही. आमने-सामने मुकाबले अनेक झाले, पण कोणालाही जीवनातून आणि राजकारणातून नष्ट करण्याचा

नतद्रष्टपणा

ना शिवसेनाप्रमुखांनी केला ना आम्ही कधी केला, पण शिवसेनेला जगूच द्यायचे नाही म्हणजेच महाराष्ट्राचा स्वाभिमानी पाठकणाच मोडून काढायचा असा विडा उचललेल्या मोदी-शहा-फडणवीस या महाराष्ट्र शत्रूंनी शिवसेनेवर जीवघेणे प्रहार करून स्वतःची मनगटे पिचून घेतली व पक्षाचे नाव, चिन्ह गमावलेल्या आमच्या शिवसेनेने महाराष्ट्रात मोदी-शहांना खडे चारले. ते खडे तोंडात तसेच ठेवून हे ‘मोगली’ वृत्तीचे लोक शिवसेनेच्या विरोधात वल्गना करीत आहेत. शिवसेनेचे मंगळसूत्र तोडून आणि मोदी-शहांचे मळवट भरून जे लाचार मिंधे स्वतःला सधवा म्हणवून घेत आहेत त्यांना या निवडणूक निकालानंतर जमिनीत गडप व्हावे लागेल. मराठेशाहीत अशा गद्दारीच्या अवलादी अनेक झाल्या. जे जे आतापर्यंत शिवसेनेच्या वाटेत आडवे आले अथवा शिवसेनेच्या पायवाटेवरून जे जे फंदफितुरी करून दूर झाले ते ते सारे पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे नष्ट झाले याची नोंद सतरा खंडांच्या इतिहासाच्या पानापानांवर आढळेल. आज महाराष्ट्राचे चित्र काय आहे? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी आणि डावे पक्ष असे सगळे महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढण्यासाठी व जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. डिवचलेले लाखो शिवसैनिक दगड मारलेल्या पोळ्यावरील मधमाश्यांप्रमाणे चौखूर उधळले आहेत. समस्त मराठी बांधव, शेतकरी युवक, ख्रिस्ती, मुसलमान बांधव महाराष्ट्र धर्माच्या विजयासाठी सज्ज आहेत. मराठी एकजूट ही तर आमची प्रेरणाच आहे. त्या प्रेरणेचा दोरच आम्ही यशोमंदिरावर फेकून विधानसभा विजयाच्या शिखरावर निघालो आहोत. महाराष्ट्राच्या हातात मशाल धगधगत आहे. मजबूत मनगटी हातात विजयाची तुतारी वाजते आहे. विजय आपलाच आहे. संतांच्या आणि शिवरायांच्या या महाराष्ट्रातील फत्तरही कधी राष्ट्राशी बेइमान होणार नाही, तो पैशाला विकला जाणार नाही, दिल्लीपुढे लाचारीने झुकणार नाही. बा महाराष्ट्रा, विजय तुझाच आहे. 288 मतदारसंघांत आपला महाराष्ट्र निवडणूक लढत आहे. महाराष्ट्र विजयी होईल! मतदार राजा, स्वाभिमानाची मशाल पेटू दे, विजयाची तुतारी वाजू दे!

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article