Published on
:
05 Feb 2025, 12:51 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:51 am
सोलापूर : शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न होतात. परंतु, मौखिक तसेच दातांच्या आरोग्याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिले जात नाही. लोक आपल्या मौखिक आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य सांभाळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे दंतरोगतज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी पाच फेब्रुवारी हा दिवस डॉ. जी. बी. शंख्वाळकर यांचा जन्मदिन ‘मौखिक आरोग्य दिन’ म्हणून ओळखला जातो. दातांची कीड, हिरड्याचे आजार, मुखदुर्गंधी, तंबाखूमुळे होणारे मुखांच्या आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात समावेश होतो. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. तरीदेखील मौखिक आरोग्याकडे गंभीरतेने बघितले जात नाही. मौखिक शुद्धता आणि दंत आरोग्य याकडे नागरिकांचे लक्ष नाही. वृद्धावस्थेत मौखिक पेशींवर परिणाम होतो. वाढत्या वयानुसार होणार्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. मौखिक आरोग्य म्हणजे केवळ दातांच्या स्वच्छतेपुरतेच मर्यादित नाही तर एकूणच मुखाची निगा राखण्याकडे लक्ष द्यावे. जेवताना रात्री दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी विशेष ब्रश आहेत. ब्रशने शास्त्रशुद्ध वापरातून दात स्वच्छ करावेत. मधुमेहासह पचनसंस्थेतील दोष यांसारख्या रोगांची पहिली लक्षणे मुखामध्येच आढळतात, असे डॉक्टरांनी सांगितले.
सकाळी आणि रात्री तीन मिनिटे दात स्वच्छ घासले पाहिजेत.
टंग क्लीनर किंवा हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे.
फटीतील कण काढण्यासाठी ‘डेंटल फ्लास’ या दोर्यानेच काढावेत.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे.
प्रत्येक तीन महिन्यांनी ब्रश बदलावा.
दिवसांतून सकाळी अन् संध्याकाळी दात घासावेत.
दंत आरोग्याकडे सारेच दुर्लक्ष करतात. वृद्धावस्थेत दातांची झीज झाल्यानंतर मौखिक आरोग्य सांभाळणे कठीण असते. तसेच लहानपणी दुधाचे दात किडले तरी ते दात पडणारच आहेत, ही भावना पालकांच्या मनात असते. मात्र, दुधाचे दात किडून पडले तर येणार्या नवीन दातांना धोका असतो. यामुळे प्रत्येकाने दिवसांतून दोन वेळा दात घासावेत. तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे टाळावे.
- डॉ. अल्पेश फडतरे, दंत चिकित्सक