हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) स्पेसवॉक केला. स्पेसवॉकवेळी अंतराळवीर बुच विल्मोर हेदेखील त्यांच्यासोबत होते. या दोघांनी जवळपास 5.5 तास स्पेसवॉक केला. यावेळी सुनीता यांनी सूक्ष्मजीवांच्या प्रयोगांसाठी नमुने घेतले. यावरून हे स्पष्ट होईल की, आयएसएसवर सूक्ष्मजीव जिवंत आहेत की नाहीत. याशिवाय तुटलेला अँटेनाही आयएसएस पासून वेगळा करण्यात आला. सुनीता विल्यम्स यांचा हा नववा स्पेसवॉक होता. त्यांनी आता अंतराळवीर पेगी व्हिटसनचा 60 तास 21 मिनिटांचा विक्रम मोडून सर्वात लांब अंतराळ चालण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत एकूण 62 तास 6 मिनिटे अंतराळात स्पेसवॉक केला आहे. बुच विल्मोर यांचा हा पाचवा स्पेसवॉक आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, जर तेथे सूक्ष्मजीव आढळले तर ते अंतराळ वातावरणात कसे टिकून राहतात आणि पुनरुत्पादन करतात हे समजण्यास या प्रयोगामुळे मदत होईल. ते अंतराळात किती अंतरापर्यंत जाऊ शकतात हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
15 दिवसांत दुसऱ्यांदा स्पेसवॉक
सुनीता यांनी अवघ्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा स्पेसवॉक केला. याआधी त्यांनी 16 जानेवारीला अंतराळवीर निक हेगसोबत साडेसहा तास स्पेसवॉक केला होता. सुनीता विल्यम्स या गेल्या 8 महिन्यापासून अंतराळात अडकल्या आहेत. त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, अद्याप त्याला यश आले नाही. या दोघांना मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रगन स्पेसक्राफ्टद्वारे परत आणले जाईल.