परभणी(Parbhani) :- परभणी शहरातील अनेक रस्त्यांवर आज अतिक्रमण (Encroachment) झाल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत जात आहे. शहरातील वसमत रोड नंतर आता जिंतूर रोड, गणपती चौक,पाथरी रोडवर तसेच शहराच्या अनेक मोकळ्या जागेवर सध्या दिसली मोकळी जागा. केलेच अतिक्रमण..थाटलेच दुकान..! अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास महामार्गही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकणार आहेत. यासर्व बाबीकडे बघ्याची भूमिका घेत प्रशासन मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष..करीत असल्याचे बोलल्या जात आहे.
शहरातील मोकळ्या जागेत अतिक्रमनाचा सुळसुळाट…
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह शहरातील सर्व मुख्य रस्त्यांना सध्या अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे.. दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असून रस्त्यावरून चालणे देखील जिक्रीचे झाले आहे. असे असताना देखील पालिका प्रशासनाचा संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष चालवले असल्याचे चित्र आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर विसाव्या फाट्यापासून खानापूर फाट्यापर्यंत शाळा, महाविद्यालय कार्यालयांच्या,घरांच्या संरक्षण भिंतीसह मोकळ्या जागा अतिक्रमणांनी व्यापली आहेत शंभर फुटांचा सांगण्यात येणारा हा राष्ट्रीय महामार्ग जेमतेम ५० ते ६० फुटांचा राहिला आहे.
बघ्याची भूमिका घेत प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..
अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीला असलेल्या अतिक्रमणधारकांनी आता रस्त्यांच्या साईड पट्ट्यावर कब्जा केला असून ग्राहकांना रस्त्यावर वाहने लावूनच खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.. या सर्व गंभीर प्रकाराकडे प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे..