सार्वजनिक वाहतूक सक्षम होणे गरजेचे: अजित पवारfile photo
Published on
:
01 Feb 2025, 9:33 am
Updated on
:
01 Feb 2025, 9:33 am
पुणे: ‘शहरातील वाढती वाहतूक कोंडी विचारात घेता आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागणार आहे. त्याशिवाय कोणताही पर्याय नाही. भविष्यातील ही आव्हाने दूर करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत,’ असे प्रतिपादन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांची नोंद पुण्यात होत आहे. काही दिवसांनी या शहरात फिरणे मुश्कील होईल, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.
नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचा वर्धापन दिन कार्यक्रम शुक्रवारी पुण्यात आयोजित केला होत, त्या वेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खात्याचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शहरांचा वाढता बकालपणा आणि त्यातून निर्माण होणार्या प्रश्नांवर पवार यांनी बोट ठेवले.
पवार म्हणाले, अजून तीस वर्षांनी म्हणजे 2054 मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची मिळून 2 कोटी लोकसंख्या होण्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणे आणि पायाभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान आहे. 1991 साली पुणे शहराला पाच टीएमसी पाण्याची गरज होती आता ती 21 टीएमसीपर्यंत पोहचली आहे. भविष्यात ही मागणी आणखी वाढणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा कसा आणि कुठून करणार, असा प्रश्न आहे.
मुठा उजवा कालव्यावर मेट्रो अन् रस्ता
खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत बोगदा होणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्य भागातून मुठा उजवा कालवा जात आहे. त्याची मोकळी जागा होणार आहे .या मोकळ्या जागेवरून रस्ता तसेच मेट्रो टाकण्यात येणार आहे. परिणामी, पुढील काळात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच अत्याधुनिक ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळी कामे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंना दादांनी काढला चिमटा
विधानसभा निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले आहे. 232 आमदारांची संख्या आहे. बहुमतासाठी 145 आकडा आवश्यक आहे. त्यामुळे हे सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे सांगून पवार म्हणाले, ‘आता कोणी कुठे जाणार नाही आणि येणार नाही. कोणी गेले तरी सरकारला फरक पडणार नाही. त्यामुळे पुढील पाच वर्षांत चांगले नियोजन करून काम करता येणार आहे.’