Published on
:
02 Feb 2025, 11:54 pm
Updated on
:
02 Feb 2025, 11:54 pm
न्यूयॉर्क : पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, पूर, त्सुनामी अशी नैसर्गिक संकटे आल्याचे आपण अनेकदा पाहतो. अशाच घटना सूर्यावरही घडत असतात. सूर्यावर आता भलेमोठे भगदाड पडले आहे. याचा परिणाम पृथ्वीवर होणार का, याची संशोधकांना चिंता लागून राहिली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर हा महाकाय विवर दिसला आहे. या विवराची रुंदी 8 लाख कि.मी. असल्याचे सांगितले जाते.
हे विवर इतके मोठे आहे की त्यात 62 पेक्षा जास्त पृथ्वी सामावू शकतात. या खड्ड्याला ‘कोरोनल होल’ असे नाव देण्यात आले आहे. स्पेस वेदरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनल होल हे असे क्षेत्र आहे, जिथे सूर्याचे चुंबकीय क्षेत्र उघडले आहे, ज्यामुळे सौर वारा कोणत्याही निर्बंधाशिवाय अवकाशात वाहतो. आता हा सौर वारा पृथ्वीच्या दिशेने वेगाने वाहत आहे. लाईव्ह सायन्सच्या अहवालानुसार, कोरोनल होलमधून निघणारा सौर वारा प्रति सेकंद 500 कि.मी.पेक्षा जास्त वेगाने पुढे जात आहे. अहवालानुसार, जेव्हा सौर वारा पृथ्वीवर पोहोचतो तेव्हा भूचुंबकीय वादळ उद्भवू शकते. सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी आदळल्यामुळे उपग्रह, रेडिओ कम्युनिकेशन आणि वीज ग्रीड्स ठप्प होऊ शकतात, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. जेव्हा सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येतो, तेव्हा अरोरा तयार होतो. सूर्याकडून येणारे चार्ज केलेले कण वरच्या वातावरणात असलेल्या वायूंशी टक्कर देतात आणि त्यांच्यात ऊर्जा हस्तांतरित करतात. ही ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर येते. त्यामुळे रात्रीच्या वेळी नॉर्दर्न लाईटस् पाहायला मिळतात. कोरोनल होल सूर्याच्या पृष्ठभागावर किती काळ टिकेल, शास्त्रज्ञही याबाबत ठोसपणे काही सांगू शकत नाहीत. अशा स्थितीत जोपर्यंत कोरोनल होल टिकून राहील, तोपर्यंत त्याचा परिणाम दिसून येईल.