Published on
:
18 Jan 2025, 8:46 am
Updated on
:
18 Jan 2025, 8:46 am
पुणे: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे. या हल्ल्याचा तपास पोलिस यंत्रणा करत असून, अनेक पथके नेमली आहेत. आरोपी शोधल्यानंतर पुढची माहिती मिळू शकेल. त्यामुळे यावर राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही.
एखाद्या घटनेनंतर लगेचच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलणे योग्य नाही. मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे विरोधकांनी आरोप न करता जबाबदारीने बोलले पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
पुण्यात शैक्षणिक विभागाच्या बैठकीअगोदर भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कलाकारांसाठी मुंबई शहर सुरक्षित राहिलेले नाही, या विरोधकांच्या आरोपांवर भुसे म्हणाले, अभिनेत्यावर हल्ला झाला म्हणून मुंबई सुरक्षित नाही हा आरोप करणे चुकीचे आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून, सर्वांसाठी महत्त्वाचे शहर आहे. घटनेचे गांभीर्य विरोधकांनी ओळखून राजकीय भाष्य करणे टाळावे आणि जबाबदारीने बोलण्याचे भान ठेवावे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही महायुती की स्वबळावर लढायची याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील. निवडणूक कोणतीही असूदे शिवसैनिक सदैव तयार असतो. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरेंचे ब्रिदवाक्य घेऊन शिवसैनिक निवडणुकीला सामोरे जातो. योग्य वेळी पालकमंत्रिपद जाहीर केले जाईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.