सोनियांच्या परदेशी वंशावर बोट अन् राष्ट्रवादीची स्थापना:पहिल्याच निवडणुकीत पक्षाला सत्तेच्या खुर्चीत बसवले, शरद पवारांच्या 'पॉवर'बाज खेळी

3 hours ago 1
शरद पवार हे नाव देशाला काही नवे नाही. शरद पवारांचे मोठे बंधू हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. त्यांच्यासोबत न जाता पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या काम करायला सुरूवात केली. पाच दशकांहून अधिक काळाचा शरद पवारांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. चला तर मग शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कशी केली? त्यांच्यासोबत काँग्रेसमधील कोणकोणते नेते होते? काँग्रेससोबत पुन्हा आघाडी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी राहिली? कोणत्या साली त्यांचे किती आमदार निवडून आले? कोणत्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली आणि त्यांचा राज्याच्या राजकारणावर कसा प्रभाव पडला? हे जाणून घेऊयात दिव्य मराठी डिजिटलसह... अन् विरोधानंतर शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले 1967 ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होती. युवक काँग्रेसचे 26 वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी 'बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढशील का? असे विचारले. मात्र बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवार या नावाला आक्षेप घेत कडाडून विरोधही केला. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसने 1 विरुद्ध 11 असा निकाल कळवला. जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढे उमेदवारांची नावे आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले. पुणे जिल्हा काँग्रेसने बारामती तालुका काँग्रेसकडून आलेला ठराव पुढे करून शरद नवखा आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे. त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही अशी भूमिका मांडून पुण्याच्या मालतीबाई शिरोळे यांच्या उमेदवारीची मागणी केली. मात्र, प्रदेशाध्यक्ष पाटील व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला. विरोधातील एकाला चव्हाणांनी विचारले, 270 पैकी किती जागी काँग्रेस विजयी होईल? नेता उद्गारला, 190 ते 200. चव्हाणांनी प्रतिप्रश्न केला, म्हणजे, 80 उमेदवार पराभूत होतील तर? नेता म्हणाला, शक्य आहे. त्याचा आधार घेऊन यशवंतराव म्हणाले, ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली असे समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या. अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. पण स्थानिक विरोध कायम राहिला. याच वेळी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची ओळख झाली आणि ते बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 मध्ये आमदार झाले. 40 आमदारांसह पवार बाहेर पडले 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली, तिचे 'इंदिरा काँग्रेस ' आणि 'रेड्डी काँग्रेस ' असे दोन भाग झाले. यशवंतरावांसह महाराष्ट्रातले अनेक नेते 'रेड्डी काँग्रेस 'मध्ये गेले ज्यात वसंतदादा पाटील, शरद पवारही होते. 1978 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या. जनता पक्ष मोठा पक्ष बनून निवडून आला, पण बहुमतापासून दूर राहिला. मग दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि या आघाडीच्या सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले, तर नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले. 1978 मधल्या या डावपेचांनी शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले, ते आजपर्यंत. तोपर्यंत पवार यशवंतरावांचा हात धरुन राजकारणात येण्यास व प्रस्थापित होण्यास बराच काळ झाला होता. पवार मंत्रीही झाले होते. पण या सरकारमध्येच अनेक नेते अस्वस्थ होते. सरकारमध्ये वाद वाढू लागले. शेवटी शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि साडेचार महिन्यात हे आघाडीचे सरकार पडले. यावेळी शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापण केला. 1978 मध्ये पवार पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. जुलै 1978 मध्ये शरद पवारांनी पुलोद सरकार स्थापण केले आणि ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. शरद पवारांचे हे सरकार जवळपास दीड वर्षे चालले. मात्र देशातील राजकारण बदलले आणि जनता पक्षात फुट पडल्यानंतर महाराष्ट्रात इंदिरा गांधी यांच्या शिफारसीमुळे राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शरद पवारांचे सरकार गेले. 1984 साली शरद पवारांनी लोकसभेची निवडणूक लढवत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. मात्र लगेचच ते दिल्लीतून परतले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1986 मध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला अन् 1988 मध्ये दुसऱ्यांदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी त्यानंतर राजकीय कारकीर्दीच्या नव्या टप्प्यावर शरद पवार यांनी पुन्हा दिल्लीत जायचे ठरवले. राजीव गांधी यांच्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद प्रकरणानंतर मुंबईत मोठी हानी झाली. त्यामुळे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात आले तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अजितदादांनी सोडली काकांसाठी खासदारकी 1991 च्या काळात शरद पवारांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजेच अजित पवार हे राजकारणात सक्रीय झाले. 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 या कालावधीत ते लोकसभेत खासदार होते. 1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.अजित पवार त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, आणि 2014 , 2019, असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. महाराष्‍ट्रात याना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे अजित पवार. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. सोनिया गांधींना विरोध काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विदेशी असल्यामुळे त्या पंतप्रधान होऊ नये, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली, आणि पी.ए.संगमा व तारीक अन्वर यांच्यासह त्यांना काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यांतर मुंबईत अधिवेशन घेत या पूर्णो अगितोक संगमा, तारीख अन्वर आणि शरद पवार या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली ज्यांचे अध्यक्षपद शरद पवारांकडे होते. तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद छगन भुजबळ यांना देण्यात आले होते. 1999 मध्ये 58 आमदार निवडून आले शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांना मोठे यश मिळाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 58 आमदार निवडून आले होते. यावेळी राज्यात शिवसेनेचे 69 आमदार भाजपाचे 56 आमदार निवडून आले होते. यामुळे युतीची गाडी 125 वर अडली होती. तर काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 75 जागा मिळवल्या होत्या. पहिलीच निवडणूक लढवणाऱ्या पवारांच्या 'राष्ट्रवादी'चे 58 आमदार निवडून आले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत 8 खासदार निवडून आले होते. 2004 मध्ये संगमांचा पक्षावर दावा 2004 ला लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. यूपीएमध्ये राष्ट्रवादी पक्ष सामील झाला. पी. ए. संगमा यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास जोरदार विरोध दर्शविला होता. संगमा हे फक्त विरोध करून थांबले नाहीत तर त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने शरद पवार यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संगमा यांनी स्वत:ची नियुक्ती केली. यानंतर पक्षाध्यक्ष म्हणून घड्याळ चिन्ह आपल्याला मिळावे, असा दावा संगमा यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता. पक्षावर केला दावा 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असेच वादात सापडले होते. हे चिन्ह आम्हाला मिळावे किंवा गोठवावे, अशी मागणी लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत पी. ए. संगमा यांच्याकडून झाली होती. निवडणूक आयोगात सुनावणी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे शरद पवार यांच्याकडे कायम राहिले व घड्याळ हे चिन्हही त्यांच्याकडेच राहिले. त्यावेळी शरद पवार यांना पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटनेत अधिक समर्थन असल्याचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केला होता. त्यावेळी पवार यांना विधानसभा आणि विधान परिषदेचे मिळून एकूण 78 आमदारांचा, तर लोकसभा आणि राज्यसभेतील 9 खासदारांचा पाठिंबा होता. तसेच संघटनेतही 657 पैकी 438 पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा त्यांना मिळाला. पहिल्या निवडणुकीत किती आमदार आले निवडून 2004 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे 71 आमदार निवडून आले. म्हणजे जवळपास 13 आमदार हे गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त निवडून आले होते. यावेळी राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा काही काळ सुरू होती. मात्र, पवारांनी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद देत केंद्रात आपली पकड मजबूत करुन घेतली. शरद पवार यांच्या नेतृत्वात या काळात 9 खासदार निवडून आले. सुप्रियाताई सुळेंची राजकीय कारकीर्द सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. 2009 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढविली आणि 3.36 लाख मतांनी विजय मिळविला. पुढे 10 जून 2012 रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस च्या 12 व्या स्थापना दिवसानिमित्त, त्यांनी तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबईत “राष्ट्रवादी युवती काँग्रेस ” सुरू केली. 2014 आणि 2019 मध्ये त्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आल्या. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी थोडी खालवली 71 आमदारांचा आकडा या निवडणुकीत 62 व आला तर काँग्रेसचे 82 उमेदवार निवडून आले. यावेळी NCP ने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत राज्यात आघाडीची सत्ता स्थापण केली. 2009 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 खासदार निवडून आले. 2014 मध्ये हे चित्र बदलले. केंद्रात भाजपचे सरकार आले, आणि राज्यात देखील काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादीचे केवळ 41 आमदार निवडून आले. तर 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा सदस्याचा आकडा घसरुन 6 वर आला. तर 2019 मध्ये केवळ 5 खासदार निवडून आले. राफेलच्या मुद्यावरुन तारीक अन्वर पडले बाहेर राफेल करारावरील वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने नाराज झालेले पक्षाचे खासदार तारीक अन्वर यांनी 2018 मध्ये तडकाफडकी राजीनामा दिला. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचाही राजीनामा दिला. तारीक अन्वर हे बिहारमधील कटिहार येथून लोकसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अन्वर पवार यांच्यासोबत होते. राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हेतूंबद्दल काहीही शंका नाही, असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यावर अन्वर नाराज झाले होते. राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी आहेत. आतापर्यंत मोदी स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकलेले नाहीत. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांच्या विधानावरून या करारामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे अन्वर यांनी सांगितले. 'असे असताना माझ्या पक्षाने पंतप्रधान मोदी यांचा बचाव करणे असमर्थनीय आहे. त्यामुळे मी पक्षाचा आणि लोकसभेतील खासदारकीचा राजीनामा देत आहे, असे अन्वर यांनी जाहीर केले. रोहित पवार झाले आमदार रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत.रोहित पवार हे राजकारणात आल्यापासून शरद पवारांसारखंच राजकारण करताना दिसतात.रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतलं शिरसूफळ हा होता. दोन वर्षांनी आलेल्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. पवारांची तिसरी पिढी राजकारणात पार्थ आणि रोहित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. आज पार्थ पवारांचा वाढदिवस आहे. 2014 मध्ये वयाच्या 24 वर्षी मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेऊन पार्थ यांनी राजकीय वाटचालीची चुणूक दाखविली पार्थ यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. बारामतीत युगेंद्र पवारांचे दौरे वाढले गेली अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. ..अन् मविआची स्थापणा केली 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्तेचा मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर सत्तेची समीकरणे फिसकटली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण यापूर्वी अजित पवारांनी भाजपसोबत युती करत 72 तास सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर काम केले. 2023 मध्ये अजितदादांनी सांगितला पक्षावर दावा 2023 हे वर्षही शरद पवारांच्या राजकीय प्रवासातले एक महत्त्वाचे वर्ष ठरले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही आमदार बाहेर पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. आणि महाविकास आघाडी विरोधी बाकावर गेली. यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर आपला हक्क सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाने आपापली बाजू मांडली. 6 फेब्रुवारी 2024 रोजी याप्रकरणी निकाल देत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला. 2024 मध्ये 10 पैकी 8 उमेदवार विजयी शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2023 मध्ये फूट पडली. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह पक्षावर हक्क सांगितल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावाने तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगड लोकसभेतून निवडून आले. पण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत, यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट निवडणुकीला कसा सामोरे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article