येथील बाजार समितीत खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.pudhari
Published on
:
15 Nov 2024, 4:05 am
Updated on
:
15 Nov 2024, 4:05 am
चांदवड (जि. नाशिक) : शेतकऱ्यांच्या मेहनतीवर हा देश उभा आहे. अन्नदात्याला जो दुखावेल तो सत्तेत बसू शकणार नाही. आज महागाई, भ्रष्टाचार वाढला आहे. त्या तुलनेत शेतीमालाला भाव नसल्याने देशाचा पोशिंदा शेतकरी कर्जात बुडाला आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सोयाबीन, कपाशीला ७ ते १० हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
येथील बाजार समितीत खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर कडाडून प्रहार केला. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येत आहे. जेव्हा कांदा बाजारात विक्रीला येतो, त्याला भाव मिळत नाही. अन जेव्हा शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नसतो त्यावेळी कांदयाला भाव मिळतो. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याचा घणाघात सुळे यांनी केला. लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याने सत्ताधाऱ्यांचा वांदा केला आहे. याची पुनरावृत्ती करण्याची संधी तुम्हाला पुन्हा आल्याचे त्यांनी सांगितले.