स्वार्थ मनात न ठेवता कर्म करत राहणे हेच खरे जगणे:‘जन पळभर म्हणतील टिंब टिंब’ नाटकाने ६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात
15 hours ago
1
कुठलेही सामाजिक कार्य आपल्याशिवाय पार पडूच शकत नाही, आपल्यावाचून प्रत्येकाचे अडून पडते, ही भावना मनात बाळणारा मनुष्य निष्काम कर्मयोग करुच शकत नाही. तो भौतिक सुखातच अडकून पडतो. उलट कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता कर्म करत राहणं, हेच खरं जगणं, असा संदेश देणारं ‘जन पळभर म्हणतील टिंब टिंब’ हे दोन अंकी नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी सादर झालं. कोपरगावच्या विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टतर्फे, अभय पैर लिखित व आत्मदर्शन बागडे दिग्दर्शित या नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं. एक दिव्यांग व्यक्ती लहान मुलींना सांगत असलेल्या गोष्टीतून नाटकाचं कथानक उलगडतं. कोणे एके गावात लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. सामाजिक कार्यातून गावाचा विकास करणारा आत्माराम कथेच्या केंद्रस्थानी आहे. गावाच्या भल्यासाठी झटणारा आत्माराम स्वत:च्या कुटुंबाकडे मात्र दुर्लक्ष करतो. गावातील प्रत्येकजण त्याला मानत असतो. एका ग्रामस्थाच्या अंत्यविधीनंतर आत्मारामला एक यक्ष भेटतो. तो आत्मारामवर कुत्सितपणे हसतो. तुझा मृत्यूही असाच सामान्य असेल, काही दिवसांनी लोक तुला विसरुन जातील, असं तो सांगतो. आत्माराम प्रत्युत्तर देतो की असं होणार नाही. सगळ्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. यावर दोघांमध्ये पैज लागते. आत्मारामच्या मृत्यूनंतर सात दिवसांत काय फरक पडेल, हे मी तुला दाखवतो, असं म्हणून यक्ष थेट त्याला भविष्यात नेतो. त्यात आत्मारामच्या मृत्यूनंतर रडणारे कुटुंबीय, गावकरी दिसतात. प्रत्येकजण आत्माराम किती चांगला होता, हे सांगत असतात. ते पाहून आत्मारामला आनंद होतो. मग गावकरी आत्मारामचा पुतळा बसवण्याचं ठरवतात. शोकसभा घेतात, पुतळ्याच्या अनावरणासाठी मंत्र्यांना बोलावतात. एकेका इव्हेंटनंतर आत्मारामच्या निधनाचं कुटुंबियांसह कोणालाच सोयरसुतक राहत नाही. हे पाहून आत्माराम चिडतो, यक्ष त्याला हे चित्र बदण्यासाठी पुन्हा गावकऱ्यांत जायची मुभा देतो. पण पुन्हा गावकऱ्यांत येऊनही तो काहीच बदलू शकत नाही. अखेर तो हार मानत आपण पैज हारल्याचं कबूल करतो. त्यावर यक्ष त्याला वास्तवाची जाणीव करुन देत अंतर्धान पावतो. पुढच्या प्रसंगात झोपलेल्या आत्मारामला त्याची पत्नी व ग्रामस्थ जागे करतात. या स्वप्नप्रवासातून आत्मारामला जगण्याचा खरा अर्थ कळतो व नाटकाचा पडदा पडतोे. आत्माराम (वसंत नारद), अनाहुत (अक्षय कंद्रे), पतंगाराव (समाधान बागले), सरपंचबाई (ऐश्वर्या बंग), बाबुराव (वैभव सोमासे), बेवडा (राहुल राऊल) यांच्या भूमिका उत्तम साकारल्या. इतरांचा अभिनयही ठीक होता. एकूण २४ कलाकार पडद्यावर वावरले. ज्ञानेश्वर पर्वत यांनी साकारलेलं नाटकाचं नेपथ्य, वेशभूषा, पार्श्वसंगीतही उत्तम होतं. संवादाचे टायमिंग किंचितसे मागेपुढे झाल्याने विनोदी प्रसंगही ताणल्यासारखे वाटले. पण ग्रामीण कलाकारांनी जीव ओतून साकारलेला पहिला प्रयत्न प्रेक्षकांना मात्र चांगला आवडला. आज रात्री ८ वा. नाटक : प्रियांका आणि दोन चोर लेखक : श्याम मनोहर दिग्दर्शक : कृष्णा वाळके सादरकर्ते : स्व. गिरधारीलाल चौधरी अभिनव ग्राम प्रबोधिनी, अहिल्यानगर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)