Published on
:
15 Nov 2024, 1:38 pm
Updated on
:
15 Nov 2024, 1:38 pm
नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. मात्र मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयाने नकार दिल्याचे आज संयोजकांना कळविण्यात आले. तशी माहिती सरहदचे संजय नहार यांनी दिली. आता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दिल्लीतील मंत्र्यांनी यासाठी प्रयत्न करुन देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा उत्सव दिमाखदार होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सरहद संस्थेच्या वतीने संजय नहार आणि लेशपाल जवळगे यांनी आज एका पत्रकाद्वारे केले आहे.
यापूर्वी २०१५ तसेच १९५४ सालीही केंद्र सरकारने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सवलतीच्या दरात रेल्वे उपलब्ध करुन दिली होती.२०१५ साली तर सुरेश प्रभू यांनी दोन रेल्वे यासाठी मंजूर केल्या होत्या. म्हणूनच ७० वर्षानंतर दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी केंद्र सरकारने रेल्वे मंजूर करण्यासाठी सरहद संस्था प्रयत्नशील होती. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सरहदने केले आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलन दिमाखात व्हावे, असे प्रयत्न सुरू आहेत. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्ली येथे हे संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनासाठी सरहद संस्था पूणे यांच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच संमेलनाच्या तयारीचा भाग म्हणून संयोजन समितीच्या वतीने पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रयत्न करीत होते. दीड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हे प्रयत्न सुरू होते. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाने नकार दिल्याचे आज संयोजकांना कळविण्यात आले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्र भाजपचे निवडणूक सहप्रभारी
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे महाराष्ट्र भाजपचे निवडणूक सहप्रभारी आहेत. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी अश्विनी वैष्णवी यांची भाजपचे निवडणूक सहप्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यापूर्वीही ते बरेच वेळा महाराष्ट्रात आले आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती किंवा साहित्य संमेलन याबद्दल चांगली माहिती आहे. असे असूनही रेल्वे मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे देण्यास नकार देण्यात आला.