मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित कुकी बंडखोरांनी मैतैई समाजाच्या तीन महिला आणि तीन लहान मुलांचे अपहरण केले होते. त्याच्या पाचव्या दिवसानंतर पोलिसांना सहा मृतदेह सापडले आहेत. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. जिरीबाम जिल्ह्यात या प्रकरणामुळे तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह शवागृहात आणण्यात आले.
सिलचर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील शवाघरात तीन महिलांचे मृतदेह आणले गेले. हे मृतदेह सडल्याने फुगले होते. त्यानंतर दुपारी आणखी दोन लहान मुलांचे आणि एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हे तीन मृतदेह अजून शवागृहात आणायचे आहेत आणि त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सरकारी कर्मचारी लैशराम हिरोजीत यांची दोन मुलं, पत्नी, सासू आणि मेव्हणीचे अपहरण करण्यात आले होते आणि त्यांचा खून करण्यात आला. सर्व मृत व्यक्ती हे मैतेई समाजाचे होते. हिरोजीत यांच्याकडे अद्याप मृतदेह ताब्यात देण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी सांयकाळी सातच्या सुमारास तीन मृतदेह शवागृहात आणले गेले.