”कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही उतरलो आहोत”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आज कल्याणमध्ये महाविकास आघाडीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा पार पडली. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
”लूटेंगे और बाटेंगे, अशी त्यांची घोषणा आहे. महाराष्ट्राला लुटणार आणि मित्रांमध्ये वाटणार, याच्याविरोधात मी मैदानात उतरलो आहे. म्हणून मला ही निवडणूक जिंकायची आहे”, असंही ते म्हणाले.
अयोध्येत भाजप हरली. तिथले खासदार आपल्या घरी आले होते. त्यांना मी म्हणालो, तुम्ही जिंकलात.. कमाल आहे तुमची. भाजप तिथे का हरली, असं मी त्यांना विचारलं असताना ते म्हणाले की, आमच्या इथे सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर आले आहेत. जिथे जाऊ तिथे खाऊ हा यांचा खाक्या बनला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अजित पवार यांना टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणले की, अखंड उपमुख्यमंत्री भव, अजित पवार यांना कोणीतरी असा आशीर्वाद दिला आहे. कोणीही आलं तर त्याचं उपमुख्यमंत्रीपद पक्कं आहेच, तो टिळा त्यांचा पुसला जात नाही. अमित शहा यांनी जाहीर केलं आहे की, त्यांची सत्ता आली, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मग दाढीवाल्यांना विचारायला हवं की, जसं देवेंद्र फडणवीस तुमच्याबरोबर उपमुख्यमंत्री झाले, तसे तुम्ही होणार का? मात्र हे होऊच शकत नाही. कारण महाराष्ट्र कधीच गद्दारांना साथ देत नाही, गद्दारांचे कडेलोटच करतो, तेच या निवडणुकीत होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
– लाडकी बहीण योजनेवर सगळ्या महिला चिडल्या आहेत. त्यांना असं वाटतं 1500 रुपये दिले तर सगळ्या महिला आपल्या नोकर आहेत.
– छत्रपती संभाजीनगरमध्ये मिंधेचे एक उमेदवार उभे आहेत. ते म्हणाले की, मत नाही दिलं, तर आम्ही तुमच्याकडून 3000 रुपये वसूल करू. तुम्ही मदत देताय म्हणता, मात्र तुमची भावना स्वच्छ नाही.
– लोकसभेत फटका बसला नसता तर महाराष्ट्रात बहिणी राहतात हे महायुतीला कळलं नसतं.
– पुन्हा आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार.
– मुलींना जसं मोफत शिक्षण मिळत आहे, तर आपलं सरकार आल्यावर मी महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना मोफत शिक्षण देणार.
– महाराष्ट्राचे लुटलेले वैभव मी पुन्हा आणून दाखवणार.
– यांनी गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडलं आणि महाराष्ट्रातील उद्योग-धंधे गुजरातला घेऊन गेले. यामुळे 25 ते 30 लाख रोजगार गुजरातला गेले.
– पत्रकार मला विचारतात, लोकसभेत जे घडलं, अजूनही वातारण तसेच आहे का? मी त्यांना म्हणालो, वातावरण तसं नाही आहे, त्याहूनही चांगलं आहे.
– लोकसभेत ते हरले, विधानसभेत त्यांचा सुपडा साफ होणार.
– सगळ्या सरकारी बससेवेचा प्रवास महिलांसाठी मोफत करणार. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार.
– पाच जीवनावश्क वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार.
– माझी शिवसेना हीच शिवसेना आहे, मिंधेची ही मिंधे सेना आहे.