संगमेश्वर तालुक्यात गुरुवारी दुपारपासून वातावरण ढगाळ होतं. रात्री नऊच्या सुमारास तालुक्याच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह आंबा-काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी 2ः45 वाजण्याच्या सुमारास अचानक खाडीपट्टा परिसरात वादळी वाऱयासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. फुणगुस, डिंगणी, परचुरी, संगमेश्वर खाडी पट्टात अचानक ढग दाटून आले आणि अंधार पसरला. काही वेळातच या परिसरात मुसळधार पावसाने बरसायला सुरूवात केली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱयांची तारांबळ उडाली.
संगमेश्वर तालुक्यात भात कापणी दरम्यानच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱयांची भात कापणी लांबली होती. गुरुवारपासून पावसाने शेतकरी वर्गाला पुन्हा एकदा दगा दिला आहे. पूर्णता तयार झालेले भात पीक अचानक आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे जमीनदोस्त झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका काजू आणि आंबा बागायतदार यांना बसणार आहे. कलमांना पालवी फुटली असून काही कालावधीत आंब्यालादेखील मोहोर येईल अशी स्थिती असताना ढगाळ वातावरण आणि पाऊस अशा खराब हवामानामुळे आंबा आणि काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत.
कुडाळात रस्त्यांना ओढय़ाचे स्वरूप
कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरात शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी वीजेच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. शुक्रवारी सायंकाळी कुडाळ शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. यावेळी प्रचंड विजांचा गडगडाट आणि लखलखाटासह धुवाधार पाऊस बरसला. या विजांचा कडकडाटाने भितीने एकच थरकाप उडाला. शहरात आलेल्या नागरीक व दुचाकीधारकांची त्रेधातिरपीट उडाली तर ग्रामीण भागात भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.