2029 मध्ये मीच उमेदवार, सोबत राहीन:मांडवेत माजी आमदार राम सातपुते यांची पराभवानंतर कार्यकर्त्याांना ग्वाही
2 hours ago
1
तुम्ही खूप प्रयत्न करूनही आपल्याला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी २०२९ ची विधानसभा मीच लढणार आहे. या काळात एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे वचन माजी आमदार राम सातपुते यांनी दिले. माळशिरस विधानसभा निवडणुकीत शनिवारी निसटता पराभव झाल्यानंतर त्यांच्या सांत्वनार्थ मांडवे येथील निवासस्थानी झालेल्या छोट्याशा सभेत ते कार्यकर्त्यांना धीर देताना बोलत होते. या वेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. तर कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून त्यांचेही डोळे भरून आले होते. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्याने आपला तोच थाट असणार आहे. आपल्याला पाहिजे तेच अधिकारी आपण तालुक्यात आणणार आहोत. ते नवीन आमदार म्हणून काहीही करतो म्हणतील, पण वर सरकार आपलेच असल्याने त्यांना पाच पैसेही मिळणार नाहीत. या वेळी अप्पासाहेब देशमुख, सतीश सपकाळ, सुजय माने-पाटील, लक्ष्मण गोरड आदी प्रमुखांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. २०२९ ची विधानसभा मीच लढवणार आहे शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो की, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. एवढेच नव्हे तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने २०२९ ची विधानसभा निवडणूक मीच लढणार आहे. कुणाच्या केसाला धक्का लागला तर तो मला लागणार आहे. मी कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. कुणाला कसली कधीही अडचण आली तरी नेहमीप्रमाणे मला कधीही फोन करा, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)