तनपुरे साखर कारखाना Pudhari
Published on
:
30 Jan 2025, 7:03 am
Updated on
:
30 Jan 2025, 7:03 am
राहुरी : सहकारातील नावाजलेल्या डॉ. विखे पाटील, सहकार महर्षी थोरात साखर कारखान्यापाठोपाठ आता राहुरीच्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संस्थेच्या सभासद असलेल्या 225 सोसायट्यांमध्ये ठराव घेण्यावरून मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी 21 फेब्रुवारीपर्यंत संबंधित ठराव मागीतले आहेत.
लोणीचा डॉ. विखे पाटील सहकारी कारखान्याच्या ब वर्ग सभासदांची यादी तयार केली जाते आहे. कारखान्याच्या सभासद असलेल्या 45 सोसायट्यांमधून प्रत्येकी 1 मतदाराचे नाव या ठरावातून साखर संचालक कार्यालयाकडे पाठविले जाणार आहे. अगदी त्याच पद्धतीने संगमनेरच्या सहकार महर्षी थोरात कारखान्याच्याही 73 सभासद सोसायट्यांमधून ठराव घेतले जाणार आहे.
राहुरीच्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 2021 मध्ये संपलेली आहे. तेव्हापासून सभासदांसह राजकीय नेत्यांनाही निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर आता तनपुरे कारखाना निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातून तनपुरे कारखान्याच्या सभासद असलेल्या सुमारे 225 सोसायट्यांना पत्रव्यवहार करून त्यांचे ठराव मागितले आहेत. संस्थांच्या ‘ब’ वर्ग मतदार संघात संबंधित ठराव असलेल्या मतदारांना मतदान करता येणार आहे. मोजके मतदान असल्याने या मतदार संघात मोठा घोडेबाजार होत असल्याने या ठरावाला मोठे ‘वजन’ आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा ठराव आपल्यालाच मिळावा, किंवा आपल्या मर्जीतील, घरातील, नात्यातील व्यक्तीलाच कसा मिळेल, यासाठी श्रेष्ठी अॅक्टीव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. ठरावावरून अनेक गावांत गटा-गटात शीतयुद्धही सुरू झाले आहे. अगदी आपल्या नेत्यांपर्यंत हे वाद पोहचल्याचेही कानावर येत आहेत.त्यामुळे अशा ठिकाणी नेते हे स्वतःच नावे सुचवत असल्याचेही बोलले जाते.
दरम्यान, तालुक्यात तनपुरे गटाकडे जास्त संस्था आहे. मात्र विखे व कर्डिले गटानेही ठरावावर लक्ष केंद्रीत केल्याचे सूत्रांकडून समजले. त्यासाठी आपल्या व विरोधकांच्या ताब्यातील सोसायटींची माहिती संकलीत केली जात असल्याचेही विश्वसनिय सूत्रांकडून समजले.
एप्रिलमध्ये धुराडा; लागा तयारीला!
21 फेब्रुवारीपर्यंत संस्थांचे ठराव मागावले जाणार आहेत. हे ठराव नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयातून कारखान्यांकडे पाठविले जातील. कारखान्याकडून विहित नमुन्यात अ व ब वर्ग सभासदांची यादी पुन्हा नगरला येईल. ऑडीटर किंवा तत्सम यंत्रणेकडून त्याची तपासणी होईल. मार्चमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर 35 दिवसांनी म्हणजे मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या मध्यावर कार्यक्रम लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘तनपुरे’साठी यंदा20 हजार सभासद मतदार?
तनपुरे कारखान्याच्या गत निवडणुकीत 27 हजार सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र यावेळी मयत, अपाक, थकबाकीदार वगळता साधारतः 20 हजार सभासद मतदानासाठी पात्र ठरू शकतात, अशी चर्चा आहे.