महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या घटना बऱ्याच वाढल्या आहेत. त्यातच बुलढाण्यामध्ये चोरांनी धुमाकूळ घातला आहे. तेथे काही चोरट्यांनी चक्क एका बँकेचे एटीएम मशीन चोरण्याचाच कट रचला. बुलढाण्याच्या खामगांव मध्ये 5-6 चोरांनी आयडीबीआय बँकेचे एटीएम उखडून ते चोरण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीच्या सुमारास 5-6 चोरटे बोलेरो कारमधून आले. त्यांनी सर्वात पहिले लोखंडी तारेला बांधून एटीएम बाहेर ओढून काढले आणि नंतर ते गाडीत भरण्यास सुरुवात केली. मात्र जास्त वजन असल्याने ते एटीएम लोड करू शकले नाहीत. अखेर चोरट्यांनी एटीएम चोरीचा नाद सोडला आणि ते घटनास्थळावरून पळून गेले. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील सुताळा संकुलात असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएमजवळ बोलेरोमधून काही चोरटे कारमधून आले. त्यांनी एटीएमच्या केबिनमध्ये घुसून मशिनला लोखंडी तारांच्या सहाय्याने वाहनाला बांधूलं आणि जबरदस्तीने ते उपटून काढलं. यानंतर चोरट्यांनी एटीएम बाहेर नेऊन गाडीत ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र मशीनचं वजन खूप जास्त असल्याने चोरटे ते मशीन कारमध्ये लोड करू शकले नाहीत. अखेर त्यांनी चोरीचा नाद सोडला आणि एटीएम तेथेच सोडून पळ काढला. मात्र चोरीच्या या प्रयत्नामुळे मोठी खळबळ माजली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बँक प्रशासनाशी संपर्क साधला. बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये एकूण चार लाख रुपये होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले आणि मशीनवरून चोरट्यांच्या बोटांचे ठसेही घेतले. पोलिसांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं.