Published on
:
20 Nov 2024, 5:08 pm
Updated on
:
20 Nov 2024, 5:08 pm
केज : केज विधानसभेच्या निवडणुकीत ६९.५९ टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र विडा येथे मतदान केंद्रा बाहेर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तर विधान सभेच्या निवडणुकीत लोकसभे प्रमाणे मतदारात उत्साह जाणवला नाही.
३२३-केज (अ.जा.) मतदार संघात ३ लाख ८७ हजार २२१ एवढी मतदारांना मतदान करण्यासाठी ४२० मतदान केंद्र होते. ३ लाख ८७ हजार २२१ मतदारा पैकी १ लाख ४३ हजार ९२४ पुरुष तर १ लाख २५ हजार ५२५ स्त्री आणि एका तृतीय पंथी असे एकूण २ लाख ६९ हजार ४५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाच्या ६९.५९ टक्के एवढे मतदान पार पडले.
मतदार संघात दिव्यांग आणि नवमतदारांमध्ये उत्साह जाणवला परंतु ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याकडे स्थलांतरित झालेले मतदार हे मतदानासाठी न आल्याने मतदानाचा टक्का घटला असल्याची चर्चा आहे.
मतदान शांततेत मतदान पार पडले. मात्र विडा या गावात मतदान केंद्रा बाहेर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. दरम्यान मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडून मतदानात व्यत्यय आल्याची एकही घटना घडलेली नाही. दरम्यान मतदारसंघात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या होत्या. रात्री उशिरा पर्यंत स्ट्रॉंग रूम मध्ये मतदान पेट्या येत आहेत.
सखी केंद्र आणि दिव्यांगासाठी मतदान केंद्र
केज पंचायत समितीच्या इमारतीत डिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग मतदान केंद्र तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत सखी मतदान केंद्र होते. या मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळीद्वारे मतदानाचा संदेश दिलेला होता. तर प्रवेशद्वारावर कमान उभारून सुशोभित करण्यात आले होते.तसेच मतदान करून आल्या नंतर सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉइंट देखील होता.
मतदान शांततेत आणि सुरळीत होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिपक वजाळे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विलास तरंगे, राकेश गिड्डे, प्रियंका टोंगे, समृध्दी दिवाणे यांनी काम पाहिले.
तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कादरी यांच्या सह सीमा सुरक्षा दलाचे जवान, दंगल नियंत्रक पथक आणि गृह रक्षक दलाचे जवान यांचा मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त होता.
खा. बजरंग सोनवणे यांनी बजावला मतदानाचा हक्क :- खा. बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या जन्म गावी सारणी (आं) तालुका के ज येथे मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.
दिव्यांग मतदार आणि नव मतदारांत उत्साह
दिव्यांग मतदार, वयोवृध्द मतदार आणि नव मतदार यांच्यात मतदान करताना उत्साह जाणवला.
९२ वर्षाच्या आजीबाईने सुद्धा केले मतदान
केज येथे ९२ वर्षाच्या आजीबाई सुमन व्यंकटराव कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
विड्यात बोगस मतदान करण्यावरून दोन गटात हाणामारी : हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
केज तालुक्यातील विडा येथे बोगस मतदान करण्यावरून भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याचा प्रकार विडा (ता. केज) येथील मतदान केंद्रावर घडला. या हाणामारीचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केज विधानसभा मतदार संघात येत असलेल्या विडा (ता. केज) येथे मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरू असताना दुपारी एक जण बोगस मतदान करताना समोर आल्यानंतर भाजप गटाने विचारणा केली. यावेळी भाजपचा स्थानिक नेता व शरद पवार गटाचे सरपंच व त्यांचे वडील यांच्यात मतदान केंद्रावर हाणामारी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी सोडवा सोडव करण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. ही मारामारी सुरू असताना काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांच्यातील हा वाद मिटला असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. या घटनेची माहिती मिळताच केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन शांत राहण्याचे आवाहन केले. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.