Published on
:
02 Feb 2025, 8:46 am
Updated on
:
02 Feb 2025, 8:46 am
जळगाव : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आज 2025-26 च्या केंद्रीय बजेटचे स्वागत करत हे बजेट भारतातील महिला आणि युवांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. बजेट सादरीकरणानंतर माध्यमांसमोर बोलताना, मंत्री रक्षा खडसे यांनी विविध लक्षित योजनांद्वारे महिलांना सशक्त बनवण्याचे आणि देशातील तरुणांना महत्त्वपूर्ण संधी प्रदान करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी "2025-26 च्या केंद्रीय बजेटने परत एकदा सरकारच्या स्वयंपूर्ण आणि प्रगतीशील देशाच्या दृष्टीकोनाचे दर्शन घडवले आहे, ज्यात युवाशक्ती, क्रीडा विकास, शेतकऱ्यांचे कल्याण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे," असे सांगितले.
2025-26 च्या बजेटचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे महिलांच्या उद्योजकतेला समर्थन देणारी नवीन योजना, ज्यामध्ये विशेषतः अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) वर्गातील व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना समर्थन दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत सरकार 2 कोटी रुपयांपर्यंतच्या विशिष्ट कालावधीसाठी कर्ज परतफेडीचे स्वरूप निश्चित (टर्म लोनची) योजना आखत आहे, ज्याचा लाभ येत्या पाच वर्षांत सुमारे 5 लाख महिलांना होईल. यामुळे कर्ज मिळवण्यात अडचणी असलेल्या महिलांना भांडवल उपलब्ध होईल. मंत्री खडसे म्हणाल्या, "आपल्या देशाचे पंतप्रधान महिलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि एकदा परत या बजेटमध्ये महिलांना पुढे आणण्यासाठी सर्व सुविधांचा पुरवठा केला गेला आहे, जे आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरक ठरतील."
मंत्री खडसे यांनी क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आणि सुधारणेसाठी संसाधनांच्या वाटपावर भर दिल्याचे सांगितले ज्याचा लाभ महिला वर्गासाठी संजीवनी ठरणार आहे. सरकारच्या अशा पुढाकारांमुळे एकूण क्रीडा परिसंस्था सुधारून महिलांना अनेक स्तरांवर सहभागी होण्याच्या नवीन संधी मिळतील. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयासाठी वाढीव बजेट वितरीत केलेली रक्कम दुर्गम भागांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांना आणि प्राथमिक विकासासाठी प्रोत्साहन देईल, जेणेकरून स्पर्धात्मक वातावरणात महिलांना अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व करण्याची संधी निर्माण होईल.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जाहीर केलेल्या नवीन योजनांमध्ये कापूस तंत्रज्ञान मिशनचा समावेश झाल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांसाठी अनेक संधी निर्माण होतील. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि महिलांना त्यांच्या समुदायांमध्ये नेतृत्वाची भूमिका साकारण्यास सक्षम बनवेल असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. भारताच्या 2047 पर्यंतच्या विकसीत देश होण्याच्या संकल्पाचा ठराव देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यासह देशाच्या नागरिकांनी घेतला आहे.