विधानसभा निवडणुका झाल्यापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे अनेक पदाधिकारी, नेत्यांनी त्यांनी सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटातील ही पडझड सुरू असतानाच आता शरद पवार गटातही पडझड होण्याची शक्यता दिसत आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे संकेतच दिले आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत आता आमच्या पक्षात इनकमिंग सुरू झाल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. तसेच एक बडा नेताही आमच्या पक्षात येणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
सुनील तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर हे मागे अजितदादांना भेटले होते. त्यांची दादांसोबत सखोल चर्चाही झाली. पण याबाबत निर्णय झाला नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी संजीवराजे असतील… या सर्वांनीच शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. संजीवराजे निघून गेल्यावर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आमचा विधानसभेचा उमदेवार विजयी झाला आहे, असं सांगतानाच संजीवराजे यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील यांच्याशी चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, असं सुनील तटकरे म्हणाले. तसेच आता इनकमिंग चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरात आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
रामदासभाईंशी चर्चा करणार
विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केलं नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यावरही सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे जेव्हा शिवसेना नेते रामदास कदम हे तक्रार करतील तेव्हा त्याची मी जरूर माहिती घेईल. कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड आणि गुहागर माझ्या मतदारसंघात येतो. त्यामुळे रामदास भाईंनी जरूर लवकरात लवकर मला ते पत्र द्यावं. त्याचं मी अवलोकनही करून माहितीही घेईल. काय काय घडलं लोकसभा आणि विधानसभेला ते समजून घेईल. रामदास भाई आणि माझे चांगले संबंध आहेत. आम्ही चर्चा करू, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते रामदास कदम?
रामदास कदम यांनी आज मीडियाशी संवाद साधताना गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांचा प्रचार केला नाही. काही लोक तर थेट उद्धव ठाकरे यांच्या गटात गेले होते. या सर्वांची नावे मला माहीत आहे. मी सुनील तटकरे यांना भेटून याबाबतची लेखी तक्रार करणार आहे. सुनील तटकरे यांच्याशी कोणतेही मतभेद नाही. त्यांच्यावर नाराजी नाही. ते माझे चांगले मित्र आहे. पण युतीत या गोष्टी होऊ नये यासाठी मी त्यांच्या कानावर विधानसभेतील प्रकार टाकणार आहे, असं रामदास कदम म्हणाले होते.