CLSA च्या अहवालाने बाजार सावरण्याची आशा

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

18 Nov 2024, 7:01 am

Updated on

18 Nov 2024, 7:01 am

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

27 सप्टेंबर 2024 रोजी निफ्टीने 26277.35 हा आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केला. सेन्सेक्सनेही त्याच दिवशी 85978.25 हा उच्चांक प्रस्थापित केला. मागील सप्ताहाचे निफ्टी आणि सेन्सेक्सचे बंद भाव पाहिले, तर ते आहेत अनुक्रमे 23,532.70 आणि 77580.31! म्हणजे आपल्या उच्चांकापासून निफ्टी साडेदहा टक्के, तर सेन्सेक्स पावणे दहा टक्के खाली आहे आणि तेही केवळ दीड महिन्यात!

परदेशी गुंतवणूक संस्थांची अखंड आणि प्रचंड विक्री कंपन्यांचे दुसर्‍या तिमाहीचे कमकुवत निकाल, वाढती महागाई, Consumption मधील मंदी, अमेरिकेतील बाँड यील्डस्मधील वाढ आणि डॉलरचे सशक्तीकरण ही कारणे भारतीय मार्केटमधील घसरणीमागे होती, हे आपण बर्‍याच वेळा पाहिले. FPIs (Foreign portfolio Investments) ची विक्री मागील सप्ताहात चारही दिवस सुरू राहिली; परंतु विक्रीचे प्रमाण अखेरच्या दिवशी म्हणजे गुरुवारी लक्षणीयरीत्या कमी झाले.

आयटी इंडेक्स वगळता सर्वच्या सर्व सेक्टरल इंडायसेस सप्ताहात मंदीत राहिले. निफ्टीमेटल आणि निफ्टी पीएसयू बँक यांची तर पार दुर्दशा झाली. हे दोन्ही इंडेक्स अनुक्रमे साडेआठ आणि सात टक्के घरंगळले. चीनची अर्थव्यवस्था उभारी घेत असताना परदेशी गुंतवणूक संस्थांचा निधी भारतीय बाजारातून चीनच्या बाजारात जाणे आणि भारतातील मेटल सेक्टर अधिकाधिक मंदीत जाणे या दोन गोष्टी विरोधाभासी आहेत. जिंदाल स्टील नाल्को, एनएमडीसी, टाटा स्टील, सेल आणि हिंद कॉपर हे शेअर्स साडेसात ते पावणे दहा टक्के घसरले. गेल्या तीन वर्षांत चौपट वाढलेल्या वेलस्पन कॉर्पने दुसर्‍या तिमाहीत निव्वळ नफ्यात 27 टक्के घसरण दाखविल्यामुळे हा शेअर पंधरा टक्के कोसळला. FMCG शेअर्समधील जोरदार मंदी हे बाजाराचे एक मोठेच दुखणे होऊन बसले आहे. ऑक्टोबर महिन्यात हा इंडेक्स सुमारे 10 टक्के खाली गेला. आजघडीला सात प्रमुख FMCG शेअर्स त्यांच्या 52 week High पासून 15 ते 22 टक्के खाली ट्रेड करत आहेत. घसरणीमध्ये टाटा कंझ्यूमर आघाडीवर आहे. शहरी भागातील Consumption मध्ये खूप मोठी घट झाल्यामुळे तसेच HUL, Nestle या प्रमुख कंपन्यांनी दुसर्‍या तिमाहीमध्ये खराब प्रदर्शन केल्यामुळे हा इंडेक्स आज मंदीत आहे. भाजीपाल्याच्या दरातील प्रचंड वाढ इतर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतील घसरणीस कारणीभूत ठरली.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प आणि त्यांच्या जोडीला आता एलॉन मस्क आल्यामुळे टेस्लाचा शेअर आणि बिटकॉईनची किंमत दोन्हीही उंच उंच भरार्‍या घेत आहेत. हे दोघेही आभासी चलनाचे खंदे समर्थक आहेत, हे दोघांनी अनेकावेळा बोलून दाखवले आहे. बिटकॉईन आज 84000 डॉलर्सच्या पार गेले आहे. एक लाखाच्याही पुढे ते गेले, तरी आश्चर्य वाटायला नको. डॉलरचा भाव 84.41 रुपये या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला आहे. भारतातील IT सेक्टरला त्यामुळेच बाळसे आले आहे. Coforge आणि Persistent Systems हे दोन शेअर्स धिरोदात्तपणे वाटचाल करत आहेत. भारतीय शेअर बाजार घसरणींचा सामना करत असला, तरी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे. Buy on dios हा मंत्र रिटेल इनव्हेस्टर्सच्या अंगी वळू लागला आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. ऑक्टोबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 41,887 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली. एकूण म्युच्युअल फंडांचा एकत्रित व्यवसाय पाहिला, तर तो पोहोचला आहे 2,40,000 कोटी रुपयांवर. देशी गुंतवणूक संस्थांची आणि म्युच्युअल फंडांची अव्याहत गुंतवणूक भारतीय बाजारात सुरूच आहे. ही गोष्ट आपण मागील लेखात पाहिली. कुठल्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांनी ऑक्टोबर महिन्यात खरेदी केली? विजेची वाढती मागणी आणि Renewable Energy कंपन्यांची क्षमता विस्ताराची तयारी पाहता म्युच्युअल फंडांनी या सेक्टरला प्राधान्य दिल्याचे दिसते. वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीमध्ये Government Spending वाढेल. त्यामुळे इन्फ्रा आणि रिअल इस्टेटमध्ये तेजी येऊ शकेल. सिमेंट सेक्टर हेवी म्युच्युअल फंडांनी खरेदीसाठी निवडल्याचे दिसते आणि तरीही सावध पवित्रा घेऊन फार्मासारख्या Defensive शेअर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केल्याचे दिसते. ज्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली ती खालीलप्रमाणे.

...शेवटी एका दिलासादायक बातमीविषयी! CLSA (Credit Lyonnais Securities Asia) या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने चीनऐवजी भारताला गुंतवणुकीसाठी प्राधान्य देणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला. शुक्रवारीही मार्केटमधील घसरणीचे प्रमाण खूपच कमी होते. निफ्टी आपल्या 200 दिवसांच्या एचआयच्या जवळ आहे. 23450 चा भरभक्कम आधार सध्या तरी आहे. निफ्टीने Doji Candle चार्टमध्ये बनवली आहे. ही कँडल Trend Reversal कँडल मानली जाते. शुक्रवारची बाजारातील स्थिती पाहता आणि त्यानंतरचा CLSA चा रिपोर्ट पाहता भारतीय बाजारात खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे; परंतु गेल्या काही दिवसांप्रमाणे Sell on Rise चे प्रमाण कमी व्हायला हवे. अन्यथा बाजार आणखी खाली जाण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article