Published on
:
08 Feb 2025, 7:21 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:21 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. जंगपुरा मतदारसंघात सिसोदिया यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. येथून त्यांच्या विरोधात भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी विजयी मिळवला आहे. सिसोदिया आणि मारवाह यांच्या कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे यावेळी आपने सिसोदिया यांना पटपडगंज विधानसभा मतदारसंघाऐवजी जंगपुरामधून तिकीट दिले होते. तर पटपडगंजमधून अवध ओझा यांना उमेदवारी दिली. गेल्या तीन निवडणुकीत आम आदमी पक्षाची जंगपुरा मतदारसंघावर मजबूत पकड राहिली होती. पण यावेळी 'आप'च्या हातून ही जागा निसटली आहे.
२०१३ मध्ये पहिल्यांदा मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज येथून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर भाजपचे नकुल भारद्वाज आणि काँग्रेसचे अनिल कुमार यांचे आव्हान होते. पण सिसोदिया यांनी पहिल्याच निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला धक्का देत ११ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
२०१५ मध्येदेखील सिसोदिया यांनी भाजपचे विनोद कुमार बिन्नी यांचा २८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. २०२० मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सिसोदिया केवळ ३,२०७ मतांनी जिंकले होते.
सिसोदियांची जागा बदलली अन्...
२०२५ मधील निवडणुकीत सिसोदिया यांना पटपडगंज मतदारसंघ बदलून जंगपुरा येथून तिकीट देण्यात आले. दिल्लीत १० वर्षांपासून 'आप'ची सत्ता आहे. सत्ताविरोधी लाटेचा मुकाबला करण्यासाठी, आपने काही नेत्यांच्या जागा बदलल्या होत्या.