Published on
:
07 Feb 2025, 11:07 am
Updated on
:
07 Feb 2025, 11:07 am
पुढारी ऑनलाइन डेस्क | देऊर येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्विस प्राइवेट लिमिटेडमध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे. तो सौदी अरेबियातील ओमान येथे गेला असताना दि. 28 जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबीयांचे बोलणे झाले होते. मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क झालेला नाही. तो ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याहुनही धक्कादायक बाब म्हणजे त्यासंदर्भात कंपनीकडे चौकशी केली असता कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजातून पाय घसरून पडून समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी यश काम करत असलेल्या कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान मुलाच्या काळजीत असलेल्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घडल्या प्रकाराची तक्रार दिली आहे. गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय, नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधात असून एमटी अथेना 1 हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते. मात्र, हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची तक्रार देवरे कुटुंबियांनी केली. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार दिली आहे.