संतकवी श्री सद्गुरू दासगणू महाराज संस्थान येथील परम पुज्य स्वामी वरदानंदजी भारती यांच्या मानस कन्या गार्गीताई उर्फ वसूमती दिनकरराव देशपांडे (75) यांचे आज सकाळी उत्तरकाशी येथे निधन झाले.
गोरठे येथे परम पुज्य स्वामी वरदानंदजी भारती यांच्या सहवासात प्रदीर्घ काळ राहिलेल्या अभ्यासू, कडक शिस्तीच्या पण प्रेमळ स्वभावाच्या वसूताईचे आज दुःखद निधन झाले. गोरठे येथे प्रदीर्घ काळ संतश्री दासगणू महाराज संस्थान येथे त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा दिली. त्यांच्या किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून अनेक जण मंत्रमुग्ध होत. लहान बालकावर तसेच युवा पिढीवर संस्कार करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. दोन वर्षापूर्वी त्या गोरठे सोडून उत्तरकाशी येथे वास्तव्यास गेल्या होत्या. त्यावेळी हजारो भाविकांनी व भक्तांनी त्यांना साश्रूनयनांनी निरोप दिला होता. मध्यंतरीच्या काळात एक दोनवेळेस त्या गोरठे येथे आल्या होत्या. शिस्त-सेवा-नित्यनेम याचे अचरण करत त्यांनी नावलौकीक मिळविला. देशभरातून विविध भक्तगण त्यांचे चाहते होते. त्यामुळे त्यांच्या या देशभरातील परिवारातील आधाराचे मोठे छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे संपूर्ण जीवन परमार्थासाठी आदर्श होते. मुला-मुलींवर उत्तम संस्कार करुन त्यांनी मार्गदर्शन केले. वरदानंद भारती यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयुष्य वाहून दासगणू परिवाराचे गोरठे येथील व्यवस्थापन समर्थपणे त्यांनी सांभाळले. कडक शिस्त त्यांनी आपल्या आयुष्यात बाळगली होती.
आज पहाटे कैलास आश्रम, उत्तरकाशी येथे त्यांचे दुःखद निधन झाले. उद्या सकाळी (08 फेब्रुवारी 2025) दहा वाजता उत्तरकाशी येथे भागिरथी नदीच्याकाठी श्री गंगाकिनारी केदारघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सबंध महाराष्ट्रातून अनेक भक्तगण उत्तरकाशीकडे रवाना झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातून श्री दासगणू प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेशअण्णा आठवले, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, गोविंद नलबलवार, जालिंदर देशपांडे, नरसिंग मुक्कावार, मनोज कोडगिरे, अशोक मामीडवार, शिवा गोडगे, सुभाषराव देशमुख, शिरीषराव देशमुख, बालाजी सावंत, विमलताई सावंत, बालाजी येरावार आदी आज उत्तरकाशीकडे रवाना झाले आहेत.