नवी दिल्लीः अमेरिकेने ४८७ कथित बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांची यादी आपल्या देशाला सोपवली असल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती दिल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, कोणत्याही भारतीय नागरिकाला परत पाठवताना गैरवर्तन करु नये यासाठी अमेरिकेशी चर्चा केली जाईल. तथापि, परराष्ट्र मंत्रालयाने हे देखील मान्य केले की बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये जाणाऱ्यांना परत पाठवण्याची एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया नवीन नाही.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी आम्हाला स्थलांतर आणि अंमलबजावणीबद्दल माहिती दिली आहे. यावर परराष्ट्र मंत्र्यांनी मानक कार्यपद्धतीची माहिती दिली आहे. बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर संपूर्ण प्रणालीवर कारवाई केली पाहिजे. परराष्ट्रमंत्र्यांनी काल संसदेत याबद्दल सांगितले होते. जर जगातील कोणत्याही देशाला आपल्या नागरिकांना परत स्वीकारायचे असेल तर त्याला खात्री असणे आवश्यक आहे की जो कोणी परत येत आहे तो भारतीय नागरिक आहे. कारण त्यात कायदेशीरपणा आणि सुरक्षिततेचे प्रश्न आहेत.
विक्रम मिस्त्री म्हणाले की, जेव्हा आम्ही अमेरिकेतून परत येणाऱ्या संभाव्य नागरिकांबद्दल माहिती मागितली. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की निर्वासितांमध्ये ४८७ भारतीय नागरिक आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत या बाबतीत खूप पारदर्शक व्यवहार केला असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी, अमेरिकेचे एक लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरले. यामध्ये १०४ भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे. यावेळी भारतीयांना कैद्यांप्रमाणे पाठवण्यात आले असल्यामुळे विरोधी पक्षांनी निषेध व्यक्त केला आहे. भारतीयांना परत पाठवण्यासाठी अमेरिकेने लष्करी विमानांचा वापर केल्याबद्दल परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, ही विशिष्ट हद्दपारी पूर्वीच्या उड्डाणांपेक्षा थोडी वेगळी आहे.