शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याचदरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर नाव न घेता जोरदार पलटवार केला आहे. ‘जर तुम्ही खऱी मर्दांची औलाद असाल तर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि पोलिसांना बाजुला ठेऊन आमच्यासोबत लढा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ खरी शिवेसना कोणाची आहे ते’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. एवढंच नाही तर जर तुम्ही आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमचं डोकं फोडू असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंचा निशाणा
त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. वाघाचं कातडं कोणी पांघरलं तर तो वाघ होत नाही. त्यासाठी त्याच्याकडे वाघाचं काळीज असायला हवं. माझ्या कामांमुळे प्रभावित होऊन सगळ्याच पक्षाचे लोक मला भेटायला येतात. मात्र आम्ही याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही.मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या वर्षा निवासस्थानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले होते. आज देखील माझे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. हे फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. कल्याण, भिवंडी आणि ठाणे विभागातील नाराज असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकांना शिवसेनेवर विश्वास आहे, जेव्हा यांचा पराभव होतो तेव्हा ते ईव्हीएमला दोष देतात असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांना विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेनं आधीच 440 व्होल्टचा झटका दिला आहे, त्यातून अजूनही त्यांना सावरता आलेलं नाहीये. लोकांनी त्यांना एकच मारली पण सॉलीड मारली असंही यावेळी शिंदे म्हणाले.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी नाव न घेता जोरदार टोला लगावला. ‘जर तुम्ही खऱी मर्दांची औलाद असाल तर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि पोलिसांना बाजुला ठेऊन आमच्यासोबत लढा’ आम्ही तुम्हाला दाखवून देऊ खरी शिवेसना कोणाची आहे ते’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.