Published on
:
27 Nov 2024, 5:04 am
Updated on
:
27 Nov 2024, 5:04 am
Pune News: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने शपथ घेण्यापूर्वीच अॅक्शन मोडवर आले असून, कचरामुक्त कसब्यासाठी त्यांनी मंगळवारी सकाळी महापालिकेच्या अधिकार्यांसोबत संपूर्ण मतदारसंघात पाहणी केली तसेच पुढील पंधरा दिवसांमध्ये कचर्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना दिली.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणुकीत कसबा पेठ मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला.
आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच रासने यांनी मंगळवारी सकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम व महापालिकेच्या अधिकार्यांसोबत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या दूधभट्टी, गणेश पेठ, ताडीगुत्ता, गंज पेठ रोड तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील भिकारदास मारुती चौक आणि रमणबाग प्रशाला या ठिकाणांची पाहणी केली. या वेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
रासने म्हणाले, निवडणूक लढत असताना मतदारसंघातील नागरिकांना विकासाचा पंचसूत्री उपक्रम राबविणार असल्याचा शब्द दिला आहे. यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कसबा घडविण्यासाठी विशेष आराखडा तयार करून कार्यवाही केली जाणार आहे.