हिंगोली (Hingoli) : हिंगोली जिल्ह्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narahari Jirwal) यांनी यावेळी केले. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज झाले. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar,) आमदार तान्हाजी मुटकुळे, (MLA Tanhaji Mutkule) आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रशासकीय सुधारणा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने (state of Maharashtra ) सर्वच क्षेत्रामध्ये विकासात झेप घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शासनाच्या विविध विभागामार्फत 100 दिवसात करावयाच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 7 कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन 100 दिवस’च्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 100 दिवसात शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासकीय सुधारणा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना जवळपास 419 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर
जिल्ह्यात सप्टेंबर, 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांच्या 2 लाख 95 हजार 171 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना (farmers) जवळपास 419 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यामध्ये कृषि विभागाने ॲग्रीस्टॅक योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे सुलभ होणार आहे. एकत्रित डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवानी या योजनेत आपला सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे शासनाने शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाचे ध्येय लक्षात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांबाबत आपला दृष्टिकोन बदलला आहे. आता प्रत्येक हाताला काम व कामाप्रमाणे दाम इथपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक हाताला काम, कामाप्रमाणे दाम व शाश्वत उत्पन्नाकरिता पाहिजे ते काम या उद्देशाने वैयक्तीक स्वरुपाच्या कामावर भर दिला आहे. यावर्षी मनरेगाअंतर्गत शेतीपूरक विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात यावर्षी 850 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 489 लाभार्थ्यांनी 468 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचा लाभ घेतला असल्याचे श्री. झिरवाळ म्हणाले.
विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध
हिंगोली येथील शासकीय महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षात 100 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी 100 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हे महाविद्यालय मानाचा तुरा ठरत आहे. तर जिल्हावासीयांच्या आरोग्यविषयक सोयी सुविधांसाठी महत्त्वाचे आणि नजिकचे रुग्णालयही ठरले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध होणार आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 50 बेडचे सुसज्ज क्रिटिकल केअर ब्लॉक, 100 बेडचे स्त्री रुग्णालय, गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. जिल्ह्यात चला जाणूया नदीला या अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षर करण्यासाठी जलदूत नेमण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्याने राष्ट्रीय जीवन्नोनती अभियान (एनआरएलएम) पोर्टलवर 100 टक्के आधार सिडींग करत देशात व राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच सन 2024-25 मध्ये हिंगोली जिल्ह्याने LokOS (लोकोस) मध्ये स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभागसंघाचे शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी झाला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना
हिंगोली जिल्ह्यातील विविध विज ग्राहकांचे नादुरुस्त रोहित्र त्वरीत बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 4 कोटी 32 लाख रुपयांचा निधीतून 100 केव्ही क्षमतेचे 250 विद्युत रोहित्र खरेदी करण्यात आले आहे. उर्जेची गरज भागविण्यासाठी पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री कुसुम योजना व मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या प्रधानमंत्री कुसुम योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास 7 हजार सौर कृषि पंप बसविण्यात आले आहेत. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतंर्गत ते बसवून देण्याचे काम चालू आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कृषि पंपाना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी क्रांतिकारी अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा नियमित व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या संशोधन केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे काम चालू आहे. वसमत हळद या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनांचा दर्जा प्राप्त झाला आहे. याचा हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी हिंगोली जिल्ह्यातील 148 गावांना शासनाने मंजुरी दिली आहे. या गावातील ग्राम कृषि विकास समिती सदस्य व सरपंच यांचे प्रशिक्षण घेण्याचे प्रकल्प स्तरावरुन नियोजन असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली.
हिंगोली नगर परिषदेने माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून 4 कोटीचे बक्षीस मंजूर झाले आहे. हिंगोली शहराच्या पुरातन जलेश्वर मंदिरालगत असलेल्या तलावाचे सुशोभिकरण करण्यात येत असून तलावाच्या संरक्षण भिंती, तलावातील गाळ काढणे यासह इतरही महत्त्वाची कामे सुरु आहेत. या तलावाच्या सुशोभिकरणामुळे हिंगोली शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय संविधानातील मूल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास राज्य तसेच आपल्या हिंगोली जिल्ह्याची चौफेर प्रगतीसाठी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री नहररी झिरवाळ यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखूवन शुभारंभ केला. तसेच त्यांनी यावेळी भित्तीपत्रिकेचीही विमोचन केले. तसेच महिला व बालविकास विभागाच्या बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा स्वाक्षरी अभियानाची सुरुवात पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केली.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी परेडचे निरीक्षण
यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. यावेळी हळद संशोधन केंद्र, कृषि विभाग, रेशीम विभाग, परिवहन विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास यासह विविध विभागाचे चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. तसेच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच शहीद गणपत भिकाजी रणवीर यांचे विर पिता भिकाजी रणवीर व वीरमाता लक्ष्मीबाइ रणवीर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी हिंगोली जिल्ह्यात उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांचा यांचा प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या डॉ. विजय निलावार, जयाजी पाईकराव, कुष्ठरोग निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉ. मनीष बगडिया, डॉ. फैसल खान यांचा, कृषि विभागातर्फे अमोल मोर, उमाजी जुंबडे, पोलीस विभागाचे आनंद मस्के यांचा प्रशस्तीपत्र, महावितरण विभागातर्फे सौरकृषी पंप उभारणी केलेले लाभार्थी श्रीराम महाजन, अनिता बांगर, संतोष जोशी, शकुंतला गायकवाड, बापूराव पाटील यांना प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ॲग्रीस्टॅक योजनेत हनुमान जगताप, शिवाजी जाधच, संजय जाधव, देविदास जाधव, रमेश जाधव यांना फार्मर आयडी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ठ संचलन केल्यामुळे पंडित अवचार यांचाही यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सर्व उपस्थितांना व्यसनमुक्ती व तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.