Published on
:
30 Sep 2024, 3:15 am
Updated on
:
30 Sep 2024, 3:15 am
औसा : औसा तालुक्यातील खानापूर तांडा शिवारात एका तरुणाचा विद्युत डीपीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला. पप्पू नीलू राठोड (वय ३६) असे तरुणाचे नाव आहे. डीपीवरून पडल्यानंतर सोबत असलेल्या शेतमालकाने तेथून पळ काढला. वेळेत उपचार मिळाले नसल्याने आणि या घटनेला कारणीभूत असलेल्या शेतमालकावर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, औसा येथील पेट्रोल पंपाचे मालक कावळे यांच्याकडे पप्पू नीलू राठोड हा कामाला होता. तो पेट्रोल पंपाच्या गाडीचा चालक म्हणून कावळे यांच्याकडे काम करत होता. रविवारी मालक कावळे हे पप्पू राठोड याला घेऊन खानापूर तांडा शिवारातील शेतात डीपीवरून विद्युत प्रवाह जोडण्यासाठी गेले होते. यावेळी पप्पू राठोड डीपीवरून खाली पडला. त्यानंतर मालक कावळे यांनी त्याला मदत न करता पळ काढला, असा आरोप पप्पू राठोडच्या नातेवाईकांनी केला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेऊन कावळे यांच्या पेट्रोल पंपावर ठिय्या मांडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत पुढील कार्यवाही केली जात आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.