ज्यांनी झाडे लावली नाहीत त्यांच्या अंत्यविधीला लाकडे द्यायचे नाहीत, अशी मागणी पाशा पटेल करणारInstagram
Published on
:
08 Feb 2025, 3:38 am
Updated on
:
08 Feb 2025, 3:38 am
लातूर : तापमान वाढ थांबवायची असेल तर लोखंड, वीज याचा वापर कमी करुन बांबूसह इतर झाडे लावली पाहिजेत. ज्यांनी बांबूसह इतर झाडे लावली नाहीत त्यांच्या अंत्यविधीला लाकडे द्यायचे नाहीत, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शुक्रवारी (दि. ७) सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व लातूर कृषी नवनिर्माण ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी नरवटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी नवनिर्माण २०२५ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
पाशा पटेल यांनी सध्या वीज आणि विजेला लागणारा कोळसा यामुळे तापमानामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. कार्बन आणि तापमान कमी केले तर आपण जगणार आहोत त्यामुळे झाडे मोठ्या प्रमाणात लावून ते जगवले पाहिजेत असे सांगितले. काँग्रेसचे नेते अभय साळुंखे यांनी रस्त्यावर काम करण्याचा डोंगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला आहे, अशी यंत्रणा जमवणे सोपे नाही, ते मनसेने करून दाखवले आहे. त्यामुळे सरकारने स्वतः पुढे येऊन अशा कार्यक्रमाला मदत करणे गरजेचे आहे. असे सांगून प्रदर्शनाला लातूरकरांनी साथ द्यावीस, असे आवाहन साळुंखे यांनी केले.
मनसेचे महाराष्ट्र शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी प्रास्ताविकात लातूर जिल्ह्यात शेतीचा दवाखाना हा नवोपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. त्याची सुरुवात रेणापूर तालुक्यातून करून नंतर त्याचा विस्तार राज्यभर करणार असल्याचे सांगितले.