Published on
:
08 Feb 2025, 6:22 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:22 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत हास्य जत्रा प्रयोग करतात. राऊत मातोश्री जवळ असल्याने अघोरी जादू कुठे चालते, याची त्यांना माहिती आहे, अशी टीका भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केली. शनिवारी माध्यमांशी ते बोलत होते.
संजय राऊत हास्यजत्रा प्रयोग करतात
दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी कालच रडीचा डाव सुरु केला. आता राज्यात बोलून बोलून राऊत थकले, त्यामुळे दिल्लीत जाऊन काल बोलले. राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वावर बोलू नये. दिल्लीत जाऊन बोलले म्हणजे राष्ट्रीय नेता होत नाही. त्यांच्या सर्टिफिकेटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवश्यकता नाही. त्यांनी चिंता करू नये, पहिला महाराष्ट्र आम्हाला नीट करू द्या, मग आम्ही आपल्या आरोपांना उत्तर देऊ. तुम्ही दिल्लीचे विश्लेषण करायला एक जागा लढवली तरी का? राऊत हास्य जत्रा प्रयोग करत आहेत. अघोरी जादू कुठे चालते, हे त्यांना माहिती आहे. कारण ते मातोश्री जवळ आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.
केजरीवाल यांचा नौटंकीपणा दिसला
दिल्ली निकालावर बोलताना दरेकर म्हणाले, अनेक वर्षानंतर भाजपला विजय मिळाला आहे. देशभरात भाजपचा विजयाचा वारू सुरु आहे. केजरीवाल यांनी जो नौटंकीपणा केला, त्याची चिरफाड जनतेने केली. केजरीवाल आणि त्यांचे नेते जेलमध्ये गेलेत. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा दिसला. लोकांना ते मूर्ख समजत होते, त्याला उत्तर भाजपने दिले. त्यांना मुस्लिम समाजाचे देखील मतदान झाले नाही. भाजपने चांगली आश्वासने दिली. त्याचे परिणाम दिसले. राहुल गांधी यांना जनता गांभीर्याने घेत नाही. आमचे सर्व नेते कष्ट करतात, केवळ नमस्कार करत गल्लीत फिरले नाहीत. काँग्रेस सोयीनुसार वागतो, असे दरेकर म्हणाले.