परभणी (Parbhani) :- शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या हजरत तुराबुल हक यांच्या ऊरुस यात्रेत काळानुरुप बदल होत आहे. पूर्वी पहाटे चार पर्यंत चालणार ऊरुस आता रात्री दहा वाजल्यानंतर सामसुम होत आहे. त्यात ठेका पध्दत सुरु झाल्याने दुकानांचे भाडे चौपट झाले आहे. ठेकेदार आणि पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे दुकाने लवकर बंद करावी लागत असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याने व्यापार्यांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे दुकाने लवकर बंद करावी लागत असल्याने प्रचंड नुकसान
सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हजरत तुराबुल हक यांच्या ऊरुस यात्रेत देश भरातून भाविक दर्शनासाठी येतात. त्याच बरोबर व्यापारी देखील विविध वस्तु व साहित्यांची दुकाने लावतात. दहा दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. दहा दिवसातील हे आर्थिक गणित काही चाणाक्ष मंडळीच्या लक्षात आल्यापासून ऊरुसात दुकान लावण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेतूनच वक्फ बोर्डाने (Waqf Board) निविदा प्रक्रिया सुरु केली. निविदा प्रक्रियेत ठेकेदारांसह राजकीय मंडळी आता उतरली आहे. त्यामुळे कोटीमध्ये बोली लागू लागली आहे. मग ही रक्कम वसूल करण्यासाठी दुकानाची भाडेवाढ केली जात आहे. सध्या ऊरुस यात्रेत दुकाने, हातगाडे, मिनाबाजार मधील स्टॉलला चौपट भाडे आकारले जात आहे.
आधीच पूर्वीसारखी ऊरुसात गर्दी होत नाही. त्यात वेळेचं बंधन आहे. त्यामुळे व्यापार्यांच्या धंद्यावर परिणाम होऊन आर्थिक उत्पन्न घटले आहे. परिणामी नुसान होत असल्याने व्यापार्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे