लातूर (Latur):- एप्रिल २०२४ पासून राज्यातील सरकारी शाळांचे थकलेले सादिल अनुदान अखेर सरकारने मंजूर केले असून त्याच्या वितरणात मान्यता दिली आहे. चालू वर्षातील अवघ्या सहा महिन्यांचे अर्थात जुलै महिन्यापर्यंतचे हे सादिल अनुदान देण्यात अखेर सरकारला यश आले.
राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची देय रक्कम अदा करण्यासाठी अनुदान मंजूर
आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच थकीत वीज देयक, किशोर तसेच जीवन शिक्षण मासिक अंक पुरवठयापोटी राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची देय रक्कम अदा करण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले. राज्य सरकारच्या (State Govt) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचे परिपत्रक गुरुवारी (दि.२८ नोव्हेंबर) काढले.
थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठीही अनुदान मंजूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या ४ टक्केपर्यंत सादिलवार खर्च करण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहे जुलै, २०२४ पर्यतच्या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठीही अनुदान मंजूर केले आहे.