जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत आणि उत्साहात पार पाडले. Pudhari File Photo
Published on
:
21 Nov 2024, 4:02 am
Updated on
:
21 Nov 2024, 4:02 am
Ahilyanagar News: जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत आणि उत्साहात पार पाडले. दुपारनंतर ‘उत्सव लोकशाहीचा’ला मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून साथ दिली. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 27 लाख 15 हजार 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे एकूण सरासरी 71.75 टक्के मतदान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या निवडणुकीच्या (69.42 टक्के) तुलनेत हे मतदान 2 टक्क्यांनी जास्त आहे.
दरम्यान, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, राम शिंदे, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, मोनिका राजळे, संग्राम जगताप, आशुतोष काळे या विद्यमान आमदारांसह चंद्रशेखर घुले, विजय औटी, राहुल जगताप व वैभव पिचड या दिग्गजांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे. या निवडणुकीद्वारे कोण कोण विधानसभेवर जाणार, याचा फैसला शनिवारी (दि. 23) होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरात निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघ असून, 151 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 37 लाख 83 हजार 987 मतदार असून, 3 हजार 765 मतदान केंद्रांवर त्यांची मतदानाची सोय करण्यात आली होती. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी साडेसहा वाजता मॉकपोल करण्यात आले. त्यासाठी 50 ईव्हीएमचा वापर करण्यात आला.
सकाळी 7 वाजता प्रत्यक्षात मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 7 पासून सकाळी 9 पर्यंत मतदान केंद्रांवर रांगा नव्हत्या. या कालावधीत 2 लाख 23 हजार 758 मतदारांनी मतदान केले. सरासरी 5.91 टक्के मतदानाची नोंद झाली. शिर्डी मतदारसंघात सर्वाधिक 8.19 टक्के मतदान झाले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी बु., आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोर्वे या आपल्या गावी मतदान केले. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुर्हानगर, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत, आमदार आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुख येथे तर संग्राम जगताप यांनी नगर शहरात मतदानाचा हक्क बजावला आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंत मतदारांत उत्साह वाढला. या कालावधीत 12 लाख 46 हजार 289 मतदारांनी मतदान केले. या कालावधीत जवळपास 33 टक्के मतदान झाले आहे. त्यानंतरच्या दोन तासांत 15 टक्के मतदान वाढले. 3 वाजेपर्यंत 18 लाख 10 हजार 955 मतदारांनी मतदान केले. जवळपास आठ तासांत जिल्हाभरात 48 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 23 लाख 44 हजार 891 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 12 लाख 14 हजार 803 पुरुष व 11 लाख 30 हजार 11 महिला मतदारांचा समावेश आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत नेवासा मतदारसंघात सर्वाधिक 70.49 टक्के मतदान झाले. अहमदनगर शहर मतदारसंघात सर्वात कमी 55.49 टक्के मतदानाची नोंद झाली. अकोले मतदारसंघात 66.40, संगमनेर मतदारसंघात 64.13, शिर्डीत 64.77, कोपरगावात 65.80, श्रीरामपूर मतदारसंघात 58.42, शेवगाव येथे 56, राहुरीत 61.40, पारनेर मतदारसंघात 61.19, श्रीगोंदा मतदारसंघात 55.49 तर कर्जत-जामखेड मतदारसंघात 66.50 टक्के मतदान झाले होते.
यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येऊन जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांच्या दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या. युवक, दिव्यांग आणि महिला मतदार देखील उत्साहात मतदानासाठी सहभागी झाले होते. सायंकाळी सहापर्यंत मतदानाची टक्केवारी वाढत गेली. यंदा मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह दिसून आला आहे.
मतदान प्रक्रिया रात्री सातसाडेसात वाजेपर्यंत सुरु होती. त्यानंतर केद्राध्यक्ष आणि मतदान अधिकार्यांनी सर्व आवरुन एसटी बसव्दारे ईव्हीएम मशीन मतदारसंघाच्या स्ट्रॅकरुममध्ये आणल्या. रात्री अशीरापर्यंत ईव्हीएम स्ट्रॉगरुममध्ये ठेवण्याची प्रक्रिया सुरु होती.
मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी त्या त्या मतदारसंघाच्या तालुकाठिकाणी होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचा कल दिसून येणार आहे.
वेबकास्टिंगमार्फत 2085 केंद्रांवर वॉच
जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के म्हणजे 2 हजार 85 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात आले होते. यामध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातील सर्वाधिक 297 मतदान केंद्रांचा समावेश होता. बुधवारी सुरु असलेल्या या प्रत्येक केंद्रावरील मतदान प्रक्रियेच्या हालचालीचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहातून करण्यात आले. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ हे स्वत: तेथे ठाण मांडून होते.तेथे बसून त्यांनी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले.
जिल्हाभरातील 36 मतदान केंद्र ‘आदर्श’
मतदान केंद्रांवर मतदारांना आनंदी वातावरण मिळावे, यासाठी प्रत्येक मतदारसंघातील तीन अशा 36 केंद्रांवर आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघातील एक मतदान केंद्र महिला कर्मचार्यांनी संचलित केले होते. जिल्ह्यातील 149 मतदान केंद्र पडदानशील करण्यात आले होते. यामध्ये अहमदनगर शहरातील 47, संगमनेर मतदारसंघातील 28 मतदान केंद्रांचा समावेश होता.