हिंगोली (Hingoli Election voting) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका युवकाने मतदान केल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल केल्याने त्याच्यावर आ. बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीचे मतदान हे गुप्त पध्दतीने असते, परंतु काहीजण अति उत्साहाने आपण केलेल्या मतदानाचा व्हिडीओ मोबाईलव्दारे काढून सोशल मिडीयावर व्हायरल करीत असतात. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने यावेळी २०० मीटरच्या आतमध्ये मोबाईल वापरावर निर्बंध घातले होते.
तसेच या संदर्भात ठिकठिकाणी पोस्टर लावून जनजागृती देखील केली होती. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. त्यामध्ये आखाडा बाळापूर हनुमान नगर भागातील संतोष शिवाजी आमले याने मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनचा (Hingoli Election voting) मतदान करताना उमेदवार यादीचा व त्याच्या समोरील चिन्हाच्या बटणावर मतदान केल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून दैनिक मराठवाडा नेता या व्हॉटस् अॅप गु्रपवर प्रसारीत करून सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहीतेचा भंग केल्याने अतुल मस्के यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष शिवाजी आमले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास आर. एम. ग्यादलवाड हे करीत आहेत.
व्हिडीओ व्हायरल केल्याचा कळमनुरी पोलिस ठाण्यातही एका विरूध्द गुन्हा दाखल
कळमनुरी: शहरातील राजू रमेश चौधरी (आर.आर. पाटील) यांनी २० नोव्हेंबर रोजी आपल्या मोबाईलवर मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान करीत असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करून एक नंबरवर असलेले उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर निशाणी धनुष्यबाण या बटनावर मतदान केल्याचा व्हिडीओ तयार करून त्यापुढे आमच ठरलय संतोष बांगर पुन्हा असे लिखाण करून व्हॉटस् ग्रुप कळमनुरी लोकप्रश्न यावर प्रसारीत केला. (Hingoli Election voting) मतदान केल्याची गुप्तता राखणे आवश्यक असताना मतदान केंद्रावर बेशिस्त गैरवर्तन केले व सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याने कळमनुरी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सतिष शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू चौधरी (आर.आर. पाटील) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास दिलीप पोले हे करीत आहेत.