हिंगोली : दुचाकीच्या डिक्कीतून व्यापाऱ्याचे साडे तीन लाख रुपये पळविले pudhari photo
Published on
:
21 Nov 2024, 12:22 pm
Updated on
:
21 Nov 2024, 12:22 pm
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या जवाहरर रोडवर पैसे पडल्याचे सांगत चोरट्यांनी एका दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून ३.५० लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
शहरातील मोंढा भागातील व्यापारी गोपाल अग्रवाल यांनी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास युनीयन बँकेतून ३.५० लाख रुपयांची रक्कम काढली होती. त्यानंतर ते जवाहर रोड भागातील संत नामदेव पतसंस्थेसमोर आले. याठिकाणी दुचाकी उभी केली असता एका भामट्याने त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर ५० रुपयांच्या व २० रुपयांच्या पाच ते सहा नोटा रस्त्यावर टाकून गोपाल अग्रवाल यांना तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. त्यांनी पाठीमागे पाहिले असता रस्त्यावर काही नोटा पडलेल्या दिसल्या. ते पैसे उचलण्यासाठी अग्रवाल दुचाकी सोडून गेले असता त्या ठिकाणी आलेल्या एका भामट्याने त्याच्या दुचाकीच्या बाजूला दुचाकी उभी केली.
तर दुसऱ्या भामट्याने अग्रवाल यांच्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातील ३.५० लाख रुपयांची रक्कम पळविली. दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलून आलेल्या अग्रवाल यांनी दुचाकीची डिकी उघडून पाहिले असता त्यातील पैसे गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने हिंगोली पोलिसांना माहिती दिली. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहायक पोलिस निरीक्षक बनसोडे, परगेवार, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संभाजी लकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात भामटे रकम पळवित असल्याचे दिसून आले. अवघ्या तीन सेकंदांत भामट्यांनी डिक्की उघडून दुचाकीवर पोबारा केल्याचे दिसून आले आहे.