परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर मतदारसंघात चर्चा
परभणी (Parbhani Assembly Elections) : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत मतदारांना पैशाचे वाटप करण्यात आल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती. तर अनेक बुथांवर मतदानाची टक्केवारी सायंकाळी ४ नंतर वाढण्याचे कारण मतदारांना पैसे वाटल्यानंतरच वाढली असल्याचे बोलले जात आहे. असे झाले असले तर ही गंभीर बाब प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक (Parbhani Assembly Elections) अटीतटीची झाली. सर्वच उमेदवार दिग्गज उभे राहील्याने पैशाचे वाटप मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. निवडणूक प्रचार यंत्रणा थांबल्यानंतर फक्त पैशांचे वाटप करुन मतदारांना आकर्षित करण्यात आल्याची चर्चा होत होती. चारही मतदारसंघात सारखीच परिस्थिती होती. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नाव बदनाम होते. पण आता परभणी, पाथरी, जिंतूर विधानसभा मतदारसंघात देखील गंगाखेड मतदारसंघासारखी परिस्थिती असल्याचे बोलले जात होते.
रात्रीतून दरवाजा वाजवून मतदारांना पैसे दिले जात होते. १०००, ५०० रुपयांवर मतदान विकत घेण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा आहे. काही ठिकाणी २ हजार ते ३ हजारापर्यंत हा रेट गेल्याचेही समजते. हा पैसा वाटप करणार्यांनी मतदान प्रक्रिया चालू झाल्यावर देखील काही गावात, प्रभागात, वार्डात जावून मतदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती. (Parbhani Assembly Elections) मतदान करण्याची शेवटची वेळ ६ वाजेपर्यंत असल्याने शेवटपर्यंत पैसे वाटून मतदान आपल्याकडे करण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा जिल्ह्यात आता गरीब उमेदवाराला निवडणुक लढविणे अवघड आहे, असे चित्र या विधानसभा निवडणुकीच्या परिस्थितीवरुन दिसून येते.