मुंबई : विक्रोळी मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे महायुतीतील उमेदवार सुवर्णा करंजे यांच्या प्रचारासाठी विक्रोळी येथे आयोजित जनसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.file photo
Published on
:
17 Nov 2024, 4:48 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:48 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | विक्रोळीची अब्रू घालवणाऱ्या भुरट्या चोरांना कायमचे तडीपार करायची वेळ आली आहे. आम्हाला कसले गद्दार म्हणताय, युतीत निवडणूक लढवून स्वार्थासाठी काँग्रेस सोबत गेलेले तुम्ही खरे गद्दार आहात, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी चढवला.
विक्रोळी मतदारसंघातील शिव- सेना पक्षाचे महायुतीतील उमेदवार सुवर्णा करंजे यांच्या प्रचारासाठी विक्रोळी येथे आयोजित जनसभेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, विक्रोळी विभाग हा कामगारांच्या कष्टाच्या घामाच्या सुवासाने फुललेले नंदनवन आहे. शिवसेनेचे कामगार नेते लीलाधर डाके यांचा आवाज याच विक्रोळीमध्ये घुमायचा. याच नंदनवनात काही गाढवं चरायला लागली आहेत. या चंगु मंगुच्या जोडीला त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून आम्ही यांचे खायचे मार्ग बंद केले. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही सुरू केला, अटल सेतू, कोस्टल रोड पूर्ण केला, महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर आणि कोस्टल रोडची १८० असे ३२० एकर जागेवर उद्यान तयार करणार आहोत. मेट्रो-३ मार्ग लवकरच पूर्ण होणार असून त्यातून २५ लाख लोकं रोज प्रवास करतील हे महायुती सरकारचे काम आहे.
या विक्रोळीत बिल्डरांचे आमदार कोण आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. बिल्डरांना हाताशी धरून सर्वसामान्य लोकांना त्रास देणाऱ्यांना कायमचे हद्दपार करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.