Published on
:
19 Nov 2024, 3:48 am
Updated on
:
19 Nov 2024, 3:48 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | आचारसंहितेच्या काळात बेहिशेबी रोकड, अवैध दारू, सोने- चांदी, अमली पदार्थांवर यंदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात एकूण ६६०.१६ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पाचपट जप्ती झाली आहे. त्या निवडणुकीत १२२.६७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. या कालावधीत बेहिशेबी रोकड, अवैध दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातूंविरोधात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात मुंबई शहर आणि उपनगरांत सर्वाधिक मालमत्तेची जप्ती झाली आहे. १८ नोव्हेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ६६०.१६७ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जप्त केलेल्या मालमत्तेच्या तुलनेत पाच पटींहून अधिक आहे. त्या निवडणुकीत एकूण १२२.६७ कोटी रुपये मूल्य असलेली संपत्ती जप्त करण्यात आली होती.
मुंबईत सर्वाधिक मालमत्ता जप्त
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात २२९.८३ कोटी रुपये, तर मुंबई शहर जिल्ह्यात ४६.८६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्तीची ही आकडेवारी पाहिली असता राज्यातील एकूण मालमत्तेच्या एक तृतीयांश भाग या दोन जिल्ह्यांत असल्याचे दिसून येते. सर्वात कमी मालमत्तेची जप्ती परभणी जिल्ह्यात झाली. तेथे ८९.४८ लाख रुपये मूल्याच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.