प्रचाराच्या तोफा आज थंडावणारfile photo
Published on
:
18 Nov 2024, 7:22 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:22 am
Pune Politics: सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या, तरी सोमवारची रात्र आणि मंगळवारचा दिवस आणि रात्र, हे मात्र प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. याच दिवसांमध्ये दिवस-रात्र लक्ष्मीदर्शनाचे प्रयोगही अनेक ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे.
प्रचार काळामध्ये पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, खासदार अमोल कोल्हे, सुषमा अंधारे या नेतेमंडळींनी प्रचाराचा फड चांगलाच गाजवला आहे.
पवारांचे ‘होम ग्राउंड’ असल्याने दोन्ही पवारांनी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची लढत होत असल्याने तेथे तर दोन्ही पवारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गावन् गाव, वाडी-वस्ती, गल्ली पिंजून काढली आहे.
सर्वच मतदारसंघांत अत्यंत चुरशीच्या लढती आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत निकालाचा अंदाज येऊ नये, अशी स्थिती असलेली ही पहिलीच निवडणूक ठरली आहे. यापूर्वी बारामती, आंबेगाव अशा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल झाल्या दिवशीच निकाल स्पष्ट झालेला असायचा. मात्र, या निवडणुकीत असे चित्र कोणत्याच मतदारसंघात दिसूनयेत नाही.
प्रचाराचे अनेक फंडे उमेदवारांनी या काळात वापरलेले आहेत. परंतु हा प्रचार जनतेच्या मुख्य प्रश्नापासून फारच दूर असलेला दिसला. शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर मात्र प्रत्येक उमेदवाराने आपले मत मांडले आहे.
आपल्या मतदारसंघातील शेतीचा पाण्याचा प्रश्न यापुढील काळात आपण सोडविणार आहोत, असे आश्वासन बहुसंख्य उमेदवारांनी या प्रचारादरम्यान दिलेले दिसते. स्थानिक प्रश्नही या निवडणुकीत गाजलेले आहेत.
आता सोमवारची रात्र मंगळवारचा दिवस आणि मंगळवारची रात्र ही मात्र उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाची राहणार आहे, अनेक ठिकाणी पैसेवाटपाचे प्रयोग या काळामध्ये होत असतात, त्यामुळे दोन्ही बाजूकडून पैसेवाटप होत असले, तरी दुसर्या उमेदवारांचे वाटप होऊ नये यासाठी एकमेकांच्या विरुद्ध फील्डिंग लावण्यात आलेली आहे. पोलिसांनी ही या दृष्टीने विशेष पथके तयार करून हे प्रकार रोखण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली आहे. वीस तारखेला मतदारराजा कोणाकडे कौल टाकतो हे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी संपल्यावरच कळणार.