Published on
:
17 Nov 2024, 5:11 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:11 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | विधानसभा निवडणुकीत प्रभागातील मताधिक्यांवर राजकीय पक्षांचे मुंबई महापालिका निवडणुकीतील भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे नगरसेवक बनण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विधानसभा निवडणुक येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची नांदी आहे. विधानसभा निवडणुकीत मिळणाऱ्या मताधिक्यावर मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत कोण बसणार, हे ठरणार आहे. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा ते सात प्रभागांवर राजकीय पक्षाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रभागात ज्या पक्षाला जास्त मताधिक्य मिळेल, त्या पक्षासाठी निवडणूक काही प्रमाणात सोपे जाणार आहे. मुंबईत २२७ प्रभाग असून यापैकी किमान ११७ ते १२० प्रभागात मताधिक्य मिळवणे आवश्यक आहे. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना-भाजप यांची महायुती होण्याची शक्यता आहे. पण महायुतीतील शिवसेना ही दुभंगल्यामुळे युतीच्या उमेदवारांना फारसा फायदा होणार नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी असल्यामुळे आघाडी २०१७ च्या तुलनेत यावेळी मजबूत असल्याचे दिसून येते.
आघाडीमुळे काँग्रेसलाही बळ मिळाले असून गेल्यावेळी काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी ही संख्या वाढू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला) काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा असल्यामुळे गेल्या वेळी पेक्षा यावेळी नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पण हे सर्व विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला मुंबई महापालिका निवडणुक पारशी अवघड जाणार नाही. मात्र मुंबईतील २२७ पैकी विमान २१७ ते २२० प्रभागांमध्ये आघाडी असणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग सर्वच राजकीय पक्षांनी पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध प्रभागांची जबाबदारी त्या त्या पक्षाच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांवर चुकवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची उमेदवारी मिळविण्यासाठी २०१७ मध्ये निवडून आलेले सर्वच माजी नगरसेवक कामाला लागले आहेत. तसेच मताधिक्य वाढविण्यासाठी राजकीय पक्षांचे युवा कार्यकर्त्यांनीही कंबर कसली असून नव मतदारांना वळवण्याची जबाबदारी युवांवर देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात टीम सक्रीय झाली आहे.