Published on
:
19 Nov 2024, 4:00 am
Updated on
:
19 Nov 2024, 4:00 am
नाशिक : १५ व्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस रॅली अन् चौक सभांनी चांगलाच गाजला. अखेरच्या दिवशी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. मतदारसंघात 'हवा' करण्यासाठी जवळपास सर्वच उमेदवारांनी पायी अन् बाइक रॅली काढत राळ उठवून दिली. बहुतांश उमेदवारांनी सकाळ आणि सायंकाळच्या चाैक सभा घेत, मतदारांना साद घातली, तर काही भागांत उमेदवारांनी रोड शो करीत मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा शांत झाल्या. मात्र, प्रचाराची धग कायम असल्याचे दिसून आले.
तब्बल ३४ दिवसांपासून 'ताई, माई, आक्का, विचार करा पक्का, अन्... मारा शिक्का' असा जोरदार प्रचार सुरू होता. सभा, रॅली, बैठका, भेटीगाठीसाठी उमेदवार दारोदार फिरताना दिसून येत होते. नाशिक जिल्ह्यातील 15 ही मतदारसंघांत पहिल्या दिवसापासून प्रचाराची राळ उठवून दिली गेली. त्यात नेत्यांच्या सभांनी मोठी भर घातली. जिल्ह्यात देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्याने निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. कौल कुणाला याचा फैसला २३ नोव्हेंबर रोजी होणार असला, तरी सद्यस्थितीत जिल्ह्यातील 15 ही जागांवरील लढती चुरशीच्या होतील, असे चित्र सध्यातरी बघावयास मिळत आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवाराने सर्व ताकद पणाला लावत मतदारसंघात 'हवा' निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी (दि. १८) भल्या पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात झाली. बहुतांश उमेदवारांनी मतदारसंघातील जॉगिंग ट्रॅक गाठत मतदारांशी पुन्हा एकदा संवाद साधत मतदानाची आठवण करून दिली. त्यानंतर सकाळी ७ ते ११ पर्यंत मतदारसंघात बाइक रॅली काढली. यात उमेदवारही कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाल्याचे दिसून आले. ११ नंतर पायी रॅली काढली. यावेळी उमेदवारांनी घरोघरी भेटीगाठी घेतल्या. चौकाचौकात उभ्या असलेल्या मतदारांशी संवाद साधला. काही भागांत मतदारांनी रोड शो करीत, मतदारांना साद घातली, तर कुठे दिवसाच चौक सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. दुपारी ४ नंतर पुन्हा एकदा उमेदवारांनी महिला, पुरुषांची रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. सायंकाळी ६ पर्यंत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवारांनी सर्व शक्तिनिशी प्रचार करीत शेवटचा दिवस गाजविल्याचे दिसून आले.
कंपन्यांच्या गेटवर उमेदवार
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात अंबड आणि सातपूर या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक वसाहती असून, कंपन्यांमध्ये कार्यरत कामगार मतदारांची या भागात मोठी संख्या आहे. त्यामुळे उमेदवारांनी बहुतांश कंपन्यांबाहेर उभे राहात येणाऱ्या- जाणाऱ्या कामगारांकडे मतांसाठी साद घातली. तिन्ही शिफ्टमध्ये कुणी ना कुणी उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर उभे असल्याचे दिसून आले.
गेल्या ३४ दिवसांपासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचार रथांवर लावलेल्या भोंग्यांचा आवाज मतदारांच्या कानी पडत होता. बहुतांश उमेदवारांनी आपल्या समर्थनार्थ गाणी तयार केली होती. हे प्रचार रथ संपूर्ण मतदारसंघात फिरविले गेले. सोमवारी सायंकाळी ६ नंतर या भोंग्यांचा आवाज शांत झाला.
संपूर्ण कुटुंब उतरले मैदानात
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारात उतरल्याचे दिसून आले. उमेदवाराला सर्व ठिकाणी जाणे शक्य नसल्याने, उमेदवाराच्या कुटुंबीयांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना साद घातली.
सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार थांबल्यानंतरही उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठीचा जोर कायम होता. रात्री उशिरापर्यंत उमेदवार, त्यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते लपूनछपून प्रचार करताना दिसून आले. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून यावर बारीक लक्ष असून, अशा बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी पथकाकडून सातत्याने पाहणी केली जात असल्याचेही दिसून येत आहे.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेऊन मतदान करावे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना ही सवलत लागू राहील. यात खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींचा समावेश आहे.