राष्ट्रवादी काँग्रेस होणार ’पॉवरफुल’File Photo
Published on
:
27 Nov 2024, 2:50 am
Updated on
:
27 Nov 2024, 2:50 am
Pune News: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील दोनपैकी एक जागा गमावली. मात्र, तरीही राज्यात मिळालेल्या यशाने शहर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळकटी मिळणार आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवारांच्या गोटात सहभागी होण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा महापालिका निवडणुकीत या पक्षाला होणार आहे.
पुणे शहरात भाजपनंतर दुसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक लागतो. मात्र, वर्षभरापूर्वी अजित पवार भाजप-शिवसेना महायुतीसमवेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेले.
मात्र, बहुतांश माजी नगरसेवक अजित पवारांसमवेत राहिले. त्यात विधानसभा निवडणुकीची गणिते डोळ्यांसमोर ठेवून काही आजी-माजी पदाधिकारी शरद पवार यांच्यासमवेत गेले. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो फटका बसला, त्यानंतर विधानसभेला परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.
त्यामुळे कार्यकर्तेही संभ्र मात होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाने अजित पवारांची राष्ट्रवादी पॉवरफुल झाली आहे. पुणे शहरातील वडगाव शेरी आणि हडपसर या दोन विद्यमान आमदारांच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्यात वडगाव शेरीच्या जागेवर कमी मताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले, तर हडपसरची कायम ठेवण्यात अजित पवारांना यश आले.
एका जागेचा फटका बसला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जो दारुण पराभव झाला, त्याचा थेट फायदा आता अजित पवारांना होणार असल्याचे स्पष्ट आहे. महायुतीत असलेली सत्ता, त्यातच पुण्याचे पालकमंत्रिपदही पुन्हा पवारांकडेच येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आगामी काळात शरद पवारांसमवेत असलेले पदाधिकारी आणि नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणे वाढणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
कार्यकर्त्यांना मिळणार महत्त्वाची पदे
महायुतीत सत्तेत आल्याने आगामी काळात पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकार्यांना विधानपरिषद, महामंडळ, शासकीय समित्या, अशा महत्त्वाच्या पदांची लॉटरी लागू शकते, असेही सांगण्यात आले.