Published on
:
27 Nov 2024, 5:23 am
Updated on
:
27 Nov 2024, 5:23 am
नाशिक : राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय - राज्यस्तरीय राजकीय पक्षांसह छोट्या - मोठ्या १५८ पक्षांचे तसेच अपक्ष मिळून एकूण ४ हजार १३६ उमेदवारांनी नशीब आजमावले. निवडणूक लढविलेल्या उमेदवारांमध्ये ३ हजार ५१३ जणांना अपेक्षित मतांचा कोटा पूर्ण न करता आल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले असून, त्यामध्ये मनसे व वंचितच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे.
- ठाकरे गटाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
- काँग्रेसच्या ९ उमेदवारांना अपेक्षित कोट्यापेक्षा कमी मते
- काँग्रेसचे ५, शिंदे सेनेच्या एकाची अनामत रक्कम जप्त
विधानसभा निवडणुकांचे सुप वाजले असून, राज्यात महायुतीला जनतेने एकहाती सत्ता बहाल केली. राज्याला आता नवीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाबद्दलची उत्सुकता आहे. पण नवीन सरकारबद्दल जेवढी उत्कंठा जनतेला आहे, तेवढीच उत्सुकता निवडणुकीत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली याबद्दलही आहे. राज्यात २८८ जागांसाठी ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राष्ट्रीय - राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा त्यामध्ये समावेश होता. त्यापैकी निवडून आलेल्या २८८ लोकप्रतिनिधींसह केवळ ६२३ उमेदवारांनाच त्यांची अनामत रक्कम वाचविता आली आहे. उर्वरित सर्व उमेदवारांना त्यांच्या डिपॉझिटवर पाणी सोडावे लागणार आहे.
विशेष म्हणजे निवडणूक लढविलेल्या १५८ छोट्या-मोठ्या पक्षांपैकी केवळ 14 पक्षांचे आमदार हे विधानसभेत पोहोचले आहे, तर २ हजार ८६ पैकी दोनच अपक्षांना विजयश्री खेचून आणता आली आहे. बहुजन समाज पक्षाने राज्यात २३७ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकाही उमेदवाराला डिपॉझिट वाचविता आलेले नाही. तिसऱ्या आघाडीच्या रूपाने राज्यात किंगमेकर आम्हीच ठरणार अशी वल्गना करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची निकालानंतर दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाने उभ्या केलेल्या २०० पैकी १९४ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्यात अपयश आले. तसेच राज्याच्या निकालानंतर आम्ही राज्याच्या सत्तेत सहभागी हाेऊ अशी 'राज'गर्जना करणाऱ्या मनसेला एकही जागा निवडुून आणता आली नाही. मात्र, एवढ्यावरच पक्ष थांबला नसून, निवडणुकीतील १२५ उमेदवारांमधून केवळ सहाजणांनी नियमानुसार अपेक्षित मते घेतल्याने त्यांची अनामत रक्कम वाचली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या ९३ पैकी ९१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. एमआयएमने १७ जागा लढविताना १ ठिकाणी विजय प्राप्त केला असून, त्यांच्या ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अराखीव उमेदवाराला १० हजार, तर राखीव मतदारसंघात ५ हजार रुपये अनामत रक्कम होती. नियमानुसार उमेदवाराला निवडणुकीत त्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मतदान पडणे आवश्यक असते. अन्यथा अनामत रक्कम जप्त होते.
राज्यातील २८८ जागांवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत ४ लाख ६१ हजार ८८६ मतदारांनी नोटा पर्यायासमोरील बटण दाबले आहे. विद्यमान उमेदवारांमधून एकही उमेदवार नको असल्याने या मतदारांनी नोटाच्या पर्यायाला पसंती दिली. राज्यात झालेल्या एकूण मतदानाच्या 0.715 टक्के इतके हे प्रमाण आहे.