कऱ्डिले प्रचार सभा Pudhari
Published on
:
18 Nov 2024, 7:12 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:12 am
राहुरीच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात केलेली विकासकामे दाखवून द्यावीत. मंत्रिपदाची संधी मिळूनही त्यांना राहुरीत साधे उपजिल्हा रुग्णालय सुरू करता आले नाही. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या मतदारसंघात केलेली विकासकामे आणि महायुती सरकारची कामगिरी यामुळे कर्डिले यांच्या विजयावर निकालाआधीच शिक्कामोर्तब झाले आहे. विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे, असा विश्वास महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ विखे पाटील यांनी बारागाव नांदूर, ब्राह्मणी, सोनेगाव सात्रळ येथे जाहीर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. राहुरी येथे विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
विखे पाटील म्हणाले, की महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पक्षातील महिलासुद्धा आता त्यांचे ऐकणार नाहीत. त्या महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करतील. महाविकास आघाडीचे अडीच वर्षे राज्यात सरकार होते, तेव्हा हे झोपले होते. त्या वेळी त्यांना लाडकी बहीण का नाही आठवली. कोविड काळामध्ये जनतेला मदतीची गरज होती. तेव्हा या जिल्ह्यातील तीन मंत्री कुठे होते? आता मी राहुरी शहरामध्ये 200 कोटींचे रुग्णालय सरकारच्या माध्यमातून सुरू करणार आहे. आमचे सरकार परत येणार आहे. त्यामुळे निधीची कमतरता कमी पडून दिली जाणार नाही, असे विखे पाटील यांनी सांगितले. त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यवर टीका केली.
तनपुरे कुटुंबीयांनी राहुरी साखर कारखाना, सूतगिरणी, विद्यापीठ अशा अनेक संस्थांचे वाटोळे केल्याने राहुरीच्या विकासावर परिणाम झाला, असा आरोप कर्डिले यांनी या वेळी केला. ही निवडणूक न लढवण्यासाठी एका माजी मंत्र्याने मला गुन्हे मागे घेण्याची ऑफर दिली होती, असा आरोपही त्यांनी केला.