Published on
:
21 Nov 2024, 11:23 am
Updated on
:
21 Nov 2024, 11:23 am
मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रापासून मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. बुधवारी (दि.20) सकाळी 7 ते 11 पर्यंतच्या चार तासांच्या कालावधीत 22.76 टक्के इतके मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर दुपारनंतरही रांगा लागल्याने सायंकाळी पाचपर्यंत 61.58 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
मालेगाव मध्य मतदारसंघातील 343 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मध्यमधून आजी-माजी आमदारांसह 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात एमआयएमतर्फे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, इस्लाम पार्टीतर्फे शेख आसिफ, काँग्रेसतर्फे एजाज बेग, तर समाजवादी पार्टीतर्फे शान-ए-हिंद यांच्यात लढत होत आहे. सकाळपासूनच काही केंद्रांवर रांगा, तर काही केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली. मालेगाव हायस्कूल, शेख उस्मान हायस्कूल, जेएटी, एटीटी, मनपा प्राथमिक शाळा 1/34, येथील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. .
मालेगाव मध्य मतदारसंघात विशेषतः मालेगावचा पूर्व विभाग मुस्लीमबहुल वस्तीचे क्षेत्र आहे. या मतदारसंघातील काही केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली होती. संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी विशेष पोलिसांची कुमक तैनात होती. बुधवारी (दि.20) सकाळी 11 ते 1 पर्यंत एटीटी हायस्कूल, जेएटी हायस्कूल, शेख उस्मान हायस्कूल, बडी मालेगाव हायस्कूल, अरम प्रायमरी, जमहूर हायस्कूल, इस्माइल नांदेडी हायस्कूल या महत्त्वाच्या मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी दिसून आली.
मालेगावच्या एटीटी, जेएटी व मालेगाव हायस्कूल येथील एका मतदान केंद्रात सखी, युथ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर सर्व अधिकारी महिला होत्या. मालेगाव हायस्कूल शेख उस्मान या केंद्रावर जिल्हा पोलिसप्रमुख आरती सिंह, डीवायएसपी मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन बंदोबस्ताबाबत माहिती घेतली. येथील तैनात पोलिसांना सूचना केल्या. या मतदारसंघात पुरुषांसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिव्यांग मतदारांना त्यांचे सहकारी मतदान केंद्रापर्यंत व्हीलचेअरने घेऊन येत होते. अनेक ठिकाणी पोलिस, होमगार्ड, स्वयंसेवकांनी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहकार्य केले. अनेक केंद्रांवर मतदारांना आपली नावे मिळविण्यास अडचण निर्माण झाली होती, तर काहींना केंद्र न सापडत नसल्याने त्यांची दमछाक झाली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.
वृद्ध, दिव्यांगांचा उत्साह तरुणाईला लाजवणारा
मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन शासनस्तरावरून तसेच सामाजिक व खासगी संस्थांकडून करण्यात येत होते. मात्र, तो हक्क बजावताना जिल्ह्यात बुधवारी (दि. 20) दुपारपर्यंत सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. त्यातच दिव्यांग व्यक्ती कुबड्या व व्हीलचेअरच्या आधाराने मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने पोहोचलेले दिसून आले. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर दिसणारा लोकशाहीने दिलेला पवित्र हक्क बजावल्याचा आनंद सर्वसामान्य नागरिक व तरुणांनाही लाजवणारा असाच होता. यात द़ृष्टिबाधित व तब्येतीने गांजलेले वृद्ध आजी- आजोबांनीही आपल्या नातवांच्या आधारे मतदान केंद्रात पोहोचून मतदान केल्याचे दिसून आले.
सेल्फी पॉइंटवर मतदारांची गर्दी
मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीत मतदान करणार्या व्यक्ती तसेच मतदान जागृती मोहिमेत सहभागी होणार्या प्रत्येक व्यक्तीने सेल्फी पॉइंटला भेट द्या व सेल्फी घेऊन आनंद मिळवा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यास मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदान हे आपले पवित्र आणि सामाजिक कर्तव्य आहे. हा दिवस सुटीचा आनंद घेण्यासाठी नसून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा आहे. आम्ही तर मतदान केले तुम्हीही मतदान करून या कार्यात सहभागी व्हावे या दृष्टीने ही संकल्पना मांडण्यात आली. यावेळी मालेगाव मध्यमधील बर्याच मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान केल्यानंतर या सेल्फी पॉइंटला भेट देण्यासाठी गर्दी केली होती.
भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मालेगाव मध्यमधील मतदान केंद्रांबाहेर स्त्री-पुरुषांच्या रांगा दिसून आल्या. तहान- भूक विसरून ते रांगांमध्ये तासन्तास उभे राहून मतदान करीत असल्याचे दिसून येत होते. लांबच लांब रांगा सामान्य माणसातही मतदानाविषयीची जागृती झाल्याचे दर्शवित होत्या.