त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : आरएसएस आणि भाजपच्या जवळ जाणे म्हणजे विषाची परीक्षा पाहण्यासारखे आहे. स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांनी देश एकसंध राहण्यासाठी म्हणून बलिदान दिलेले आहे. भाजप हा महात्मा गांधींना गोळी मारणाऱ्या गोडसेंची पूजा करणाऱ्यांचा पक्ष आहे. मोदी सरकारच्या शेतकरी, महिला, युवक, कामगार कोणाही समाधानी नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लीकार्जुन खरगे यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केला.
त्र्यंबकेश्वर येथे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवारच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लीकार्जुन खरगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत पंधरा लाखांच्या घोषणेपासून नोटबंदी, जीएसटीसह कटेंगे तो बटेंगे पर्यंतच्या घोषणांचा खरपूस समाचार घेतला. खा. मल्लीकार्जुन खरगे यांनी हिंदी आणि मराठीतून भाषण करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ महाकुंभमेळ्यासाठी काँग्रेस काम करणार आहे. जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी एक होऊन मत देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने केलेल्या राष्ट्रउभारणीची माहिती देत भाजपने केलेला अपप्रचार त्यांनी आपल्या भाषणात खोडून काढला. स्व. राजीव गांधी यांनी युवकांना वयाच्या 18 व्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. अन्नसुरक्षा कायदा काँग्रेसने केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात धरणांचे अनेक प्रकल्प, आयआयटी, वैद्यकीय महाविद्यालयासारखी मोठी कामे झाली. मोदी यांच्या कालावधीत एकही मोठे लक्षणीय काम झालेले नाही. कांदा सोयाबीन यांना भाव देणे जमलेले नाही. कामगारांना जास्तीचे तास काम करण्याचे धोरण आणत आहेत. राज्यात पन्नास खोकेचा प्रयोग केला. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स यांचा वापर करत काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. मोदीजींनी सांभाळून बोलावे उगाचच खोटे बोलू नये, असा इशारा त्यांनी दिला.
छत्रपतींचा पुतळा पडल्याने स्वाभिमान दुखावला आहे. बुलेट ट्रेनसाठी बांधलेला पूल पडला. नवीन संसद भवन, अयोध्येतील राम मंदिर गळत आहे. उज्जैन येथे बसवलेले पुतळे गायब झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या सभेत व्यासपीठावर खा. शोभा बच्छाव, खा. नासीर हुसेन, ज्येष्ठ नेते राजराम पानगव्हाणे, आकाश छाजेड, शरद आहेर, रामदास धांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर येथे साधारणत: चार किमी अंतरावर जव्हार रोडवर रेणुका मंगल कार्यालयाच्या लगत असलेल्या मैदानावर सभेसाठी मंडप उभारलेला होता. व्यासपीठावर खरगे दाखल होईपर्यंत उपस्थित नेत्यांचे भाषण सुरू असताना वादळ सुरू होऊन मंडपात हवा घुसल्याने जहाजाच्या शिडाप्रमाणे छत फुगले आणि त्याच्या चिंधड्या उडाल्या. प्लास्टिक खुर्च्या अस्ताव्यस्त झाल्या. व्यासपीठावरचे छत तुटले. तोपर्यंत खा. खरगे सभास्थळी पोहोचलेले नव्हते. मंडप कारागीरांना तातडीने तुटलेला भाग बाजूला करत त्याची उभारणी केल्याने सभा सुरळीत सुरू झाली.