मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या अंमली पदार्थांविरुद्धच्या मोहिमेत अडथळा आणणाऱ्या किंवा व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. कांगपोक्पी जिल्ह्यात अफूच्या लागवडीच्या नाशाच्या निषेधार्थ जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केल्याची ही घटना घडली.
मुख्यमंत्र्यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई बाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. बेकायदेशीर अफू उत्पादन घेणारे 25 एकरहून अधिक अफूचे शेत नष्ट करण्यात आले आहे.
‘अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून, तेंग्नौपाल विभागातील खुदेई खुल्लेन टेकड्यावर असलेले 25 एकरहून अधिक अवैध अफूची लागवड नष्ट करण्यात आली आहे’, असं मुख्यमंत्र्यांनी X वर पोस्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या या कारवायांना काही लोक रस्त्यावर उतरून अडथळे आणण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या अडथळ्यांबद्दल, सिंह म्हणाले की, एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत.
एका भागात कारवाई सुरू असताना मोठ्या प्रमाणात जमाव बाहेर आला. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या होत्या. त्यांनी घटनास्थळी पोहोचत जबरदस्तीने कारवाई थांबवली. ही कारवाई सुरू असताना मर्यादित पोलीस संख्या असल्याचं त्यांना लक्षात आल्यानं त्यांनी परिस्थिती ओळखून पोलिसांना लक्ष्य केलं. पोलिसांच्या तीन वाहनांची तोडफोड केली आणि अधिकाऱ्यांना मोहीम थांबवण्याचा इशारा दिला. अखेर काही काळासाठी कारवाई थांबवण्यात आली.
दरम्यान या परिसरात आता आणखी पोलीस तुकड्या पाठवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.